हे जनसुरक्षा विधेयक आहे की भाजप सुरक्षा?   

उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र

मुंबई, (प्रतिनिधी)  : जनसुरक्षा विधेयकाला राजकीय दुरुपयोगाचा वास येतो आहे. नक्षलवाद संपत आला. मग, हा कायदा कोणासाठी आणता? विधेयकात कुठेही नक्षलवाद असा उल्लेख नाही. हे भाजप सुरक्षा विधेयक आहे का? अशी टीका शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली.
 
या विधेयकाला विधानसभेत मंजुरी मिळाल्यानंतर शुक्रवारी विधान परिषदेत ते मंजूर करण्यात आले. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, बहुमताच्या जोरावर सरकारने हे विधेयक विधानसभेत मंजूर केल्याबद्दल टीका केली. सत्ताधारी बहुमताचा दुरुपयोग करत आहेत. मात्र, त्या विधेयकातील काही गोष्टींना आमचा विरोध आहे. सरकारच्या कथनी व करणीत फरक आहे. नक्षलवादाचा, दहशतवादाचा बिमोड करायचा असा त्यांचा दावा आहे. परंतु, या विधेयकात कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवादाचा उल्लेख नाही. सुरुवातीला फक्त कडवी डावी विचारसरणी, कडव्या डाव्या विचारांच्या संघटनांवर कारवाई असा उल्लेख आहे. मुळात डावा-उजवा कसे आणि कोण ठरवणार? हे राज्यघटनेच्या विरोधात आहे. आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत सर्वसमावेशकता, समानता, सामाजिक न्याय, व्यक्तीस्वातंत्र्य याचा स्पष्ट उल्लेख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील म्हणतात, ‘सबका साथ सबका विकास’, मग हे डावं आणि उजवं असा फरक करण्याची गरज काय ? असा सवाल उद्धव  यांनी केला.
 
विधेयकातील मसुद्यात जे काही लिहिले त्यातून फरक कळत नाही. सरकारला देशविघातक शक्तींचा बिमोड करायचा असेल तर त्यांनी आम्हाला विचारायची आवश्यकता नाही. आम्ही सरकारबरोबर होतो, आहोत आणि राहू. परंतु, तुम्ही राजकीय हेतूने प्रेरित विधेयक आणत असाल तर आमचा त्याला विरोध आहे. हे धोकादायक विधेयक आहे. 
 
या विधेयकाला राजकीय दुरुपयोगाचा वास येत आहे. नक्षलवाद संपत आला, मग कायदा कोणासाठी? विरोधकांना त्रास देण्यासाठी कायदा आणत आहात का? असा सवाल उद्धव यांनी  केला. या विधेयकाचे नाव जनसुरक्षा विधेयक असे असले तरी हे विधेयक भाजपच्या सुरक्षेसाठी आणल्याची टीका उद्धव यांनी केली.
 

Related Articles