बदलत्या वातावरणाचा मिरची उत्पादकांना फटका   

बेल्हे (वार्ताहर) : सतत बदलत्या वातावरणाचा मोठा फटका आणे-माळशेज पट्ट्यातील मिरची उत्पादक शेतकर्‍यांना बसत आहे. माळशेज परिसरात मागील सहा ते सात वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दरवर्षी शेतकरी विविध रोपवाटिकांतून मार्च-एप्रिल महिन्यातच ओतूरसह उदापूर, रोहोकडी, डिंगोरे, पिंपळगाव, जोगा, मांदरने, नेतवड भागांतील शेतकरी शेतात बेड पाडून त्यावर मल्चिंग करून हिरव्या मिरचीचे उत्पादन घेत आहेत.
 
मिरची लागवडीत कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळत असल्याने मिरची लागवड करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र, यंदा मे महिन्यातील सततचा अवकाळी व संततधार पावसामुळे पहिल्यांदाच मिरची उत्पादनात घट झाली आहे. मागील काही वर्षांत मिरची पिकातून मिळालेल्या उत्पन्नातून अनेक शेतकरी लखपती झाले आहेत. मिरचीमुळेच त्यांच्या जीवनात समृद्धी आल्याचे सांगताना दिसत आहेत. मिरची हे नाजूक पीक असल्याने त्यावर लवकर रोग होतो आणि तो आटोक्यात आणण्यासाठी शेतकर्‍यांना लाखो रुपयांचा खर्च सहन करावा लागतो.
 
मिरची तोडणीला आली की, भाव घसरतात कारण उत्पादन वाढल्यावर शेतकरी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मिरची विक्रीस आणतात. त्यामुळे बाजारात मिरचीची उपलब्धता मागणीच्या तुलनेत जास्त होते आणि भाव घसरतात. सध्या हंगामाच्या शेवटी, अचानक बदललेल्या हवामानामुळे खूप पाऊस झाल्याने मिरचीच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे.

बोकड्या रोगाची लक्षणे

हा रोग काही ठिकाणी चुरडा-मुरडा किंवा व्हायरस म्हणूनही ओळखला जातो. लक्षणे मुख्यतः पानांवर आणि झाडाच्या वाढीवर दिसतात. पानांचा आकार बदलतो, पानांचे वरच्या बाजूला वळण होते, पानांच्या कडा वरच्या किंवा आतल्या बाजूने दोन्ही प्रकारे दुमडले जातात. ज्यामुळे पाने होडीसारखी दिसतात. नवीन पाने खूप लहान होतात आणि त्यांची वाढ थांबते. पाने जाड व खरखरीत होतात.

’बोकड्या’, ’कोकड्या’ रोग शेतकर्‍यांसाठी मोठी समस्या

बोकड्या शेतकर्‍यांसाठी समस्या मिरचीवरील ’बोकड्या’ किंवा ’कोकड्या’ रोग हे शेतकर्‍यांसाठी मोठी समस्या ठरत आहे. हा रोग सहसा व्हायरसमुळे होतो आणि तो फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी व कोळी यांसारख्या रसशोषक किडींमार्फत प्रसारित होतो. या रोगांमुळे मिरचीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होतो, आणि कमी दर्जाच्या मिरचीला बाजारात कमी भाव मिळतो. सध्या अवकाळी व सतत धारेमुळे मिरची पिकावर ’बोकड्या’ रोग आल्याने ५० ते ६० टक्के उत्पन्न कमी झाले आहे. पूर्वी मिरचीचा बाजारभाव ६०० रुपये किलो होता; पण आता काही शेतकर्‍यांच्या मिरच्यांना फक्त १०० ते २५० रुपये मिळत आहेत. चांगल्या दर्जाच्या मिरच्यांना मात्र ४०० ते ५०० रुपये भाव टिकले आहेत.
 
ओतूर परिसरात उन्हाळ्याच्या दिवसापासून मिरची पिकाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. सतत मिरची लागवड होणे आणि सध्याच्या तापमानातील चढउतारामुळे मिरचीवर रसशोषक किडींचा उपद्रव वाढला आहे. या रसशोषक किडींमुळे मिरची पिकावर चुराडा, मुरडा, बोकड्या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे सर्व शेतकर्‍यांनी वेळेवर रसशोषक किडींचे नियंत्रण करावे, जेणेकरून मिरची पिकातील रोगांपासून बचाव होईल.

- सुरेश घोलप, सहायक कृषी अधिकारी

 

Related Articles