चित्रफित बाहेर आल्याने मंत्री संजय शिरसाट अडचणीत   

मुंबई, (प्रतिनिधी) : हॉटेल विट्स प्रकरण व प्राप्तीकर विभागाच्या नोटीसीमुळे आधीच वादाच्या भोवर्‍यात सापडलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी मंत्री शिरसाट यांची एक चित्रफीत जारी करत खळबळ उडवून दिली. यात शिरसाट हे एका खोलीत पलंगावर बसून सिगारेटचे झुरके ओढताना दिसत असून पलंगाशेजारी नोटांनी भरलेली बॅग या चित्रफीतमध्ये दिसत आहे. शिरसाट यांनी मात्र त्या बॅगेत पैसे नाही तर कपडे असून, हा आपल्या बदनामीचा कट असल्याचा आरोप केला आहे.
 
खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर मंत्री शिरसाट यांची चित्रफीत जारी केली असून ती पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केली आहे. 
 
ही चित्रफीत जारी करताना राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची मला दया येते! असे सांगत हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस, असा टोलाही  राऊत यांनी लगावला. ही रोमांचक चित्रफीत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी बघितली पाहिजे, असे राऊत म्हणाले. तसेच, देशात हे काय चालले आहे? असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्रातील एका मंत्र्याचा ही चित्रफीत अतिशय बोलकी आहे, असेही राऊत म्हणाले.

मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न...

चित्रफीतवर खुलासा करताना संजय शिरसाट यांनी, चित्रफीतमध्ये तुम्ही पाहत आहात ते माझे घर आहे. मी खोलीत बसलेलो आहे. बाजूला माझा लाडका कुत्रा आहे आणि तेथे बाजूला एक बॅग ठेवली होती. प्रवासातून आल्यानंतर कपडे काढून मी पलंगावर बसलो होतो. एवढी मोठी पैशांची बॅग ठेवायची असती तर अलमारी नव्हती का?, असा सवाल करत यांना कपड्यांची बॅगसुद्धा नोटांनी भरलेली दिसते. यांना पैशांशिवाय दुसरे काहीच दिसत नाही, असे म्हणत या बॅगेमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असा दावा केला. मला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही शिरसाट यांनी केला.
 

Related Articles