कामगार नेत्याला दहा लाखाची खंडणी घेताना पकडले   

सोलापूर, (प्रतिनिधी) : पंढरपूर तालुक्यातील एक तथाकथित कामगार नेता तसेच पेशाने वकील असलेल्या किरण पुरुषोत्तम घोडके याला १० लाख रुपयांची खंडणी घेताना पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.आमदार अभिजीत पाटील चेअरमन असलेल्या पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी घोडके याने एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यातील १० लाख रुपयांचा पहिला हफ्ता घेताना किरण घोडके याला पंढरपूर कॉलेज चौकातील एका हॉटेलमध्ये पकडले. पंढरपूर शहर पोलिसांनी किरण घोडके याला ताब्यात घेतले आहे.
 
घोडके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी पगाराच्या मागणीसाठी पुण्यामध्ये साखर आयुक्तालयास शाखा कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील स्वयंघोषित कामगार नेता आणि पेशाने वकील असलेल्या किरण घोडके याने या आंदोलनात सहभाग घेतला होता. तसेच कामगारांना पाठिंबा देत कामगारांची देणी मिळवून देण्याचे आश्वासनही त्याने कामगारांना दिले होते. 
 
शिवाय आमदार अभिजीत पाटील चेअरमन असलेल्या या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी करण्याचे किरण घोडके हा सातत्याने धमकी देत होता. बदनामी थांबविण्यासाठी त्याने एक कोटी रुपयांची खंडणी साखर कारखान्याकडे मागितली होती. अखेर शुक्रवारी सायंकाळी सोलापूर पंढरपूर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये तडजोडीअंती पहिल्या हफ्ता म्हणून दहा लाख रुपयांची खंडणी घेताना किरण घोडके याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
 

Related Articles