खडकवासला धरणाजवळ प्रेमीयुगलाची आत्महत्या   

पुणे : मांजरीतील महादेवनगरमधील १६ वर्षांची मुलगी आणि एका तरुणाने खडकवासला धरणाजवळ विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. प्रेमसंबंध आणि त्याला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध असल्याने ही घटना घडल्याचा अंदाज वानवडी पोलिसांनी वर्तविला आहे.
 
अपूर्वा गुरसाळे (मांजरी) यांनी गुरुवारी रात्री वानवडी पोलिस ठाण्यात आपली बहीण अक्षरा बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तिने बहिणीला ९३ अव्हेन्यू चौक येथे सोडले होते. मात्र, वर्ग संपल्यानंतर ती घरी परतली नाही. शोधाशोध करूनही न सापडल्याने रात्री दहाच्या सुमारास अपूर्वाने तक्रार दाखल केली.या प्रकरणाचा पोलिस उपनिरीक्षक लोंढे तपास करीत होते. तक्रारीनुसार संतोष बाळासाहेब कळसाईत (रा. मांजरी, मूळ ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याच्यावर संशय होता. संतोष आणि अक्षरा दोघे एकत्र असल्याच्या शक्यतेतून शोध सुरू झाला. 
 
शुक्रवारी सकाळपासून दोघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, त्याचा मोबाइल बंद होता. संतोषच्या मूळ गावी सरपंचाशी संपर्क साधला, तेव्हा तो तेथे नसल्याची माहिती मिळाली. दरम्यान, उत्तमनगर पोलिसांना खडकवासला धरणाजवळ एका तरुण- तरुणीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यावर ते अक्षरा व संतोष असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, वानवडी पोलिसांना खबर देण्यात आली.
 
अक्षरा अकरावीला असून, तिची आई शिक्षिका, वडील एसटी चालक आहेत. संतोषचे वडील मोलमजुरी करतात. तो नोकरीच्या शोधात होता. दोघेही एकाच इमारतीत राहात असल्याने दोन-तीन महिन्यांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मुलीच्या कुटुंबीयांना याची कल्पना होती आणि त्यांचा याला विरोध होता. यामुळेच तणावाखाली येऊन त्यांनी आत्महत्या केली असावी.
 
- सत्यजित आदमाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वानवडी
 

Related Articles