म्युझिक व्हिडीओमुळे संतापले वडील, टेनिस अकादमीलाही विरोध   

राधिका हत्या प्रकरणात गुन्हेगार समोर 

दिल्ली : गुरुग्रामच्या सेक्टर ५७ मध्ये २५ वर्षीय टेनिसपटू राधिका यादव हिची वडील दीपक यादव यांनीच गोळ्या घालून हत्या केली. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या धक्कादायक घटनेबाबत नवी माहिती समोर येत आहेत. पोलीस तपासात असे निष्पन्न झाले की, राधिकाचा एक म्युझिक व्हिडीओ ज्यावरून तिचे वडील खूप रागावले होते, ते यामागचे एक प्रमुख कारण असू शकतो.
 
राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू राधिका यादवने सेक्टर ५७ मध्ये स्वतःची टेनिस अकॅडमी चालवण्याचे तिचे स्वप्न पूर्ण केले होते. परंतु तिचे वडील दीपक यादव, जे माजी बँक कर्मचारी होते, ते याच्या विरोधात होते. मुलीच्या कमाईवरून लोक त्यांची खिल्ली उडवत असल्याने ते नाराज होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दीपकने राधिकाला बऱ्याचवेळा अकादमी बंद करण्यास सांगितले, परंतु राधिकाने त्यांचे ऐकण्यास नकार दिला. हे मतभेद देखील वडील आणि मुलीमधील भांडणांचे एक प्रमुख कारण झाले. 

इन्फ्लुएन्सर होण्याचे स्वप्न भंगले 

राधिकाच्या हत्येचा आणखी एक पैलू समोर आला आहे, जो तिने बनवलेल्या एका म्युझिक व्हिडिओशी संबंधित आहे. दीपक यांना हा व्हिडीओ आवडला नाही आणि त्यांनी राधिकाला सोशल मीडियावरून तो काढून टाकण्यास सांगितले होते. परंतु सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राधिकाने ते मान्य केले नाही. यामुळे दीपक आणखी संतापले.

राधिकावर झाडल्या ५ गोळ्या

गुरुग्राम पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता सेक्टर ५७ मधील सुशांत लोक-२ मधील पहिल्या मजल्यावर ही घटना घडली. राधिका स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना तिचे वडील दीपक यांनी तिच्यावर पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी तीन राधिकाच्या पाठीला लागल्या. राधिका जागीच कोसळली. तिचे काका कुलदीप यादव आणि आणखी एक नातेवाईक पीयूष यांनी तिला रुग्णालयात नेले , परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

वडिलांनी कबूल केला गुन्हा

पोलिसांनी दीपक यादव यांना घटनास्थळावरून अटक केली आणि रिव्हॉल्व्हर जप्त केले. पोलीस चौकशीत दीपक यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्यांनी सांगितले की, गावकऱ्यांनी टोमणे मारले, मुलीच्या कमाईवर जगत असल्याचं म्हणत होते आणि राधिकाचा अकॅडमी चालवण्याचा आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्याचा निर्णय अपमानास्पद होता. 
 

Related Articles