ओपन एआय आणणार नवा स्मार्ट वेब ब्राउझर   

सॅन फ्रान्सिस्को : कृत्रिम बुद्धिमत्तेतील आघाडीची कंपनी ओपन एआय लवकरच स्वतःचा वेब ब्राउझर बाजारात आणणार आहे. हा ब्राउझर थेट गुगल क्रोमला आव्हान देणार आहे. 
या नव्या ब्राउझरमध्ये पारंपरिक वेबपेजऐवजी चॅटजिपीटी सारखा संवादात्मक इंटरफेस वापरकर्त्यांना अनुभवायला मिळणार आहे. म्हणजेच वापरकर्ता वेबसाइट्सवर क्लिक करण्याऐवजी थेट चॅटद्वारे आवश्यक माहिती मिळवू शकणार आहे. याशिवाय हे ब्राउझर वापरकर्त्याच्या वतीने फॉर्म भरणे, आरक्षण करणे यांसारख्या गोष्टी स्वयंचलितपणे करू शकेल. हे ब्राऊजर येत्या काही आठवड्यांत  सादर होण्याची शक्यता आहे. कंपनीचा उद्देश वेब ब्राऊझिंगच्या पारंपरिक पद्धतीची पुनर्रचना करणे हा आहे.  
 
गेल्या दोन दशकांपासून गुगल क्रोमने ब्राउझर आणि सर्च मार्केटमध्ये वर्चस्व गाजवले आहे; परंतु आता ओपनएआय क्रोमसारखी इकोसिस्टम तयार करण्याची योजना आखत आहे. त्याचा उद्देश केवळ ब्राउझिंगला एआयने सुसज्ज करणे नाही तर भविष्यात एआय सर्च इंजिनद्वारे वापरकर्त्यांना जोडणे देखील आहे.
 
एआय मॉडेल्स विकसित करण्यासाठी ओपनएआयला मोठ्या प्रमाणात डेटाची आवश्यकता असते आणि ब्राउझरद्वारे कंपनी मोठ्या प्रमाणात वापरकर्ता डेटा मिळवू शकते. यामुळे त्याच्या कृत्रिम जनरल इंटेलिजेंस मोहिमेलाही गती मिळू शकते.दरम्यान, ओपनएआय हे जॉनी आयव्ह यांच्या स्टार्टअपसोबत एक नवीन  उपकरण तयार करत आहे. याचा उद्देश लोकांच्या दैनंदिन जीवनात एआयचा अखंडपणे समावेश करू शकणारे हार्डवेअर तयार करणे हा आहे.
 

Related Articles