मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यात शेख हसीना यांच्यावर आरोप निश्चित   

ढाका : मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसह पाच प्रकरणांमध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर ढाक्यातील न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले आहेत.  
जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या हिंसाचारात जवळपास १ हजार ४०० नागरिकांच्या मृत्यूसाठी युनूस सरकारने शेख हसीना यांना जबाबदार धरले आहे. या हिंसाचारात मारले गेलेल्यांपैकी बहुतेक विद्यार्थी होते. या प्रकरणात न्यायाधिकरणाने शेख हसीना, माजी गृहमंत्री असदुज्जमान खान आणि माजी पोलीस महानिरीक्षक अब्दुल्ला अल मामून यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. या तिघांवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनांना दडपण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आणि निष्पाप निदर्शकांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने त्यांच्यावर मानवतेविरुद्ध संघटित गुन्ह्याखाली खटला चालवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
 
तथापि, शेख हसीना आणि असदुज्जमान खान सुनावणीसाठी उपलब्ध नाहीत. दरम्यान, अब्दुल्ला अल मामुन तुरुंगात आहे आणि त्याने त्याच्यावरील आरोप स्वीकारले आहेत.दरम्यान, मे महिन्यात महमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत बंदी घातली. युनूस यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी अवामी लीग आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण येथे सुरू असलेला खटला पूर्ण होईपर्यंत ही बंदी कायम राहील. जुलै २०२४ मध्ये चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले होते. याशिवाय, आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात खटला चालवणार्‍या तक्रारदारांना आणि साक्षीदारांना संरक्षण देण्यासाठी देखील हा निर्णय घेण्यात आला आहे.
 

Related Articles