ट्रम्प हल्ला प्रकरण सहा गुप्तहेरांचे निलंबन   

निष्काळजीपणाचा आरोप

वॉशिंग्टन : मागील वर्षी पेनसिल्व्हेनिया येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळल्याबद्दल सहा गुप्तहेर सेवा एजंटना निलंबित करण्यात आले आहे. 
 
१३ जुलै २०२४ रोजी पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका सभेदरम्यान ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता. एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली आणि ते जखमी झाले. या हल्ल्यात ट्रम्प यांच्या प्रचार फेरीत उपस्थित असलेले अग्निशमन दलाचे जवान कोरी कॉम्पेराटोर ठार झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी  हल्लेखोर थॉमस मॅथ्यू क्रूक्स याला गोळ्या घातल्या. या घटनेनंतर डिसेंबरमध्ये १८० पानांचा अहवालही प्रसिद्ध करण्यात आला होता, ज्यामध्ये १३ जुलैची घटना दुःखद होती पण ती रोखता आली असती असे म्हटले होते. या घटनेचे वर्णन गुप्तहेर सेवेचे अपयश म्हणून करण्यात आले.
 
या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होण्याच्या ४ दिवस आधीच ट्रम्प प्रशासनाने निष्काळजीपणाचा आरोप करत सहा गुप्तहेर सेवा एजंटना निलंबित केले. निलंबित गुप्तहेरांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. १० ते ४२ दिवसांसाठी हे निलंबन करण्यात आले असून, गुप्तहेरांना अपील करण्याचा अधिकार आहे.  दरम्यान, या हल्ल्याच्या ६४ दिवसांनंतर ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. या दोन घटनांनंतर, ट्रम्प यांना राष्ट्रपती दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली. 
 

Related Articles