डिसेंबरपर्यंत निवडणुकीची तयारी पूर्ण करा   

बांगलादेशाच्या हंगामी सरकारचे प्रशासनाला आदेश 

ढाका : बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख महमद युनूस यांनी  अधिकार्‍यांना डिसेंबरपर्यंत सार्वत्रिक निवडणुकीची तयारी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.युनूस यांचे सचिव शफीकुल आलम म्हणाले, युनूस यांनी निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून सर्व कायदा अंमलबजावणी संस्थांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे निर्देश गृह मंत्रालयाला दिले आहेत. सर्व संबंधित पक्षांनाही डिसेंबरपर्यंत सर्व निवडणूक तयारी पूर्ण करण्यास सांगितले आहे, जेणेकरून पुढील वर्षी रमजानपूर्वी १३ व्या राष्ट्रीय निवडणुका घेता येतील.
 
पुढील वर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीला राष्ट्रीय निवडणुका घेण्याचे संकेत युनूस यांनी जूनच्या सुरुवातीला दिले होते. जूनमध्ये युनूस यांनी लंडनमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान यांच्याशी चर्चा केली. रहमान यांनी पुढील वर्षी रमजानपूर्वी निवडणुका घेण्याचा प्रस्ताव मुख्य सल्लागारांना दिला. जर सर्व तयारी पूर्ण झाली तर २०२६ मध्ये रमजान सुरू होण्याच्या आधीच्या आठवड्यातही निवडणुका घेता येतील, असे युनूस आणि रहमान यांच्यातील चर्चेनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
 

Related Articles