बिहारमध्ये मतदार यादी सुधारणा सुरूच राहणार   

नवी दिल्ली : बिहारमधील मतदार यादी सुधारणा सुरु राहणार आहे. त्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी परवानगी दिली. तसेच, ही प्रक्रिया घटनात्मक असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे. आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी २८ जुलै रोजी होणार आहे. बिहारमधील मतदार यादीत सुधारणा करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष मोहीम जाहीर केली आहे. या निर्णयास १० विरोधी पक्षांच्या नेत्यांसह दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वोच्च्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
 
न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या पीठासमोर यासंदर्भातील अर्ज सुनाववणीस आहे. सर्वोच्च न्यायालयाने मतदार यादी सुधारणा सुरूच राहील, असे स्पष्ट केले असले तरी प्रक्रियेच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आयोगाने २१ जुलैपर्यंत आपले म्हणणे प्रति-प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्यास सांगितले आहे.
 
राजद खासदार मनोज झा, तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा, काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाल, शरद पवार राष्ट्रवादी गटातील सुप्रिया सुळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा, समाजवादी पक्षाचे हरिंदर सिंग मलिक, शिवसेना (उद्धव ठाकरे) चे अरविंद सावंत, झारखंड मुक्ती मोर्चाचे सरफराज अहमद आणि सीपीआय (एमएल) चे दीपांकर भट्टाचार्य यांसह दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी हे अर्ज दाखल केले आहेत.
 

Related Articles