गुरदासपूरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न उधळला   

चंडीगढ : पंजाब पोलिसांच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि खलिस्तानी संघटना बाबर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित दहशतवादी हल्ल्याचा मोठा प्रयत्न उधळला. वेळीच कारवाई करत पोलिसांनी गुरुदासपूरच्या जंगलातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त केली. ती पाकिस्तानात बसलेल्या दहशतवादी हरविंदर सिंग ऊर्फ रिंडा याच्या साथीदारांना पोहोचवायची होती. 
 
जप्त केलेल्या वस्तूंमध्ये दोन ॒एके-४७ रायफल, १६ जिवंत काडतुसे, दोन मॅगझिन आणि दोन पी-८६ हँडग्रेनेड यांचा समावेश आहे. ही शस्त्रे पाकिस्तानी एजन्सी आणि रिंडाने पंजाबमध्ये अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने पाठवली होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठा हल्ला टळला आहे. 
 
पोलिसांनी या प्रकरणात स्फोटके कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून, लवकरच संबंधित दहशतवाद्यांची ओळख पटवून त्यांना अटक केली जाईल, असे पंजाब पोलिसांनी म्हटले आहे.

Related Articles