बारामतीतील अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचा आज बंद   

बारामती, (प्रतिनिधी) : राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात बारामती आयएमएच्या कार्यकारिणीची सभा ९ जुलैला झाली. त्यावेळी सरकारच्या होमिओपॅथी डॉक्टरांच्या संबंधित निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला व चर्चा करण्यात आली.
 
यावेळी राज्य संघटनेच्या निर्णयानुसार आज सकाळी आठ वाजल्यापासून २४ तासांसाठी बारामतीतील अत्यावश्यक सोडून सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत न्यायालयात याचिका असतानाही हा निर्णय घेतलाच कसा, असा सवाल इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे.
राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांबाबत घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा, धोकादायक व जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बारामती शाखेने केला असून, या निर्णयाविरुद्ध राज्यासह बारामतीत आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. फार्माकॉलॉजी या विषयात एक वर्षाचा ब्रिज कोर्स करणार्‍या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करणार आहेत. १५ जुलैपासून ही नोंदणी सुरू होईल. ती पूर्ण केल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टर्स अ‍ॅलोपॅथीची औषधे लिहून देऊ शकतील. अर्थातच त्यांना कौन्सिलची मान्यता राहणार आहे. फेब्रुवारी महिन्यात आयएमएने राज्य सरकारच्या संभाव्य निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. ती न्यायप्रविष्ट असून अंतिम निर्णय झालेला नसतानाही सरकारने १५ जुलै पासून होमिओपॅथी डॉक्टरांचा राज्य मेडिकल कौन्सिलच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 
 
होमिओपॅथी व अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांची कुठेही तुलना होऊ शकत नाही. डॉक्टरांना ’मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिशनर’ म्हणून मान्यता दिली गेली तर सामान्य रुग्ण गोंधळात पडतील. आपत्कालीन परिस्थितीत चुकीचे औषधोपचार, चुकीचे निदान, सर्जिकल अज्ञान यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका होऊ शकतो. राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात आज व उद्या सकाळी ८ या वेळेत सर्व डॉक्टर्स वैद्यकीय सेवा बंद ठेवतील (अत्यावश्यक सेवा वगळून). १९ जुलैला मुंबईत मोर्चा काढला जाणार असल्याचे बारामती शाखा अध्यक्ष डॉ. संतोष घालमे, सचिव अमोल भंडारे व खजिनदार डॉ. सौरभ निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी कार्यकारिणीतील डॉ. अशोक तांबे, डॉ. संजय पुरंदरे, डॉ. महेंद्र दोशी, डॉ. विक्रांत धोपाडे, डॉ. दिनेश ओस्वाल, डॉ. सौरभ मुथा, डॉ. विभावरी सोळुंके, डॉ. स्नेहलता पवार, डॉ. रेवती संत, डॉ. प्राजक्ता पुरंदरे, डॉ. दीपिका कोकणे, डॉ. शुभांगी वाघमोडे उपस्थित होते.
 

Related Articles