कुकडी प्रकल्पामध्ये ४८.१९ टक्के पाणीसाठा   

भीमाशंकर, (वार्ताहर) : आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील सहा धरणे मिळून असलेल्या कुकडी प्रकल्पामध्ये सतत पडणार्‍या पावसामुळे गुरुवारी ४८.१९ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याच कुकडी प्रकल्पात ९.३७ टक्के पाणीसाठा होता.
 
आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण व जुन्नर तालुक्यातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा व घोड ही सहा धरणे मिळून कुकडी प्रकल्प तयार झाला आहे. या प्रकल्पातील डिंभे धरण सर्वांत मोठे असून या धरणाची १२.५० टीएमसी पाणीसाठवण क्षमता आहे. या डिंभे धरण क्षेत्रात सतत पडणार्‍या पावसाने धरण ६८.०८ टक्के भरले असून सुमारे दोन महिन्यांनी १० जुलैला डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात सूर्याचे दर्शन झाले आहे. 
 
कुकडी प्रकल्पातील पाण्यावर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, पारनेर, करमाळा हे तालुके व पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, जुन्नर तीन तालुके अवलंबून आहेत. कुकडी प्रकल्पातील पाणी वाटपावर पुण्याबरोबरच नगर जिल्ह्याचे देखील लक्ष असते. कुकडी प्रकल्पातील गुरुवारी आकडेवारी नुसार डिंभे धरणात ६८.०८ टक्के, तर येडगाव धरणात ८६.९३ टक्के, माणिकडोह धरणात  २४.२१  टक्के, वडज धरणात ६४.७०  टक्के, पिंपळगाव जोगे धरणात २२.६४  टक्के तर घोड धरणात ९०.७१ टक्के, चिल्हेवाडी धरणात ७८.७८ टक्के व  विसापूर ९९. ०५ टक्के धरणे भरलेली आहेत. तर वडज व येडगाव धरणातून सांडवा विसर्ग चालू आहे.
 

Related Articles