परमबीर सिंह यांना क्लिन चीट   

मुंबई : खंडणी प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना सीबीआयने क्लिन चीट दिली असून तसा अहवाल त्यांनी गुरुवारी न्यायालयात सादर केला आहे.पाच कोटी रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह, सुनील जैन आणि संजय पुनामिया यांच्यासह पाच जणांविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तर जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या दोन्ही प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत सुरू होता. या दोन्ही गुन्ह्याचा तपास करून सीबीआयने परमबीर सिंह यांना क्लिन चीट दिली.
 
परमबीर सिंग यांनी ठाणे आणि मुंबई पोलिस दलात आयुक्त पदावर काम केले. मात्र, निवृत्तीनंतर त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. २०१८ मध्ये परमबीर सिंह हे ठाणे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यावेळी यूएलसी घोटाळ्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अगरवाल यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरोधातील मकोक्का कायद्यांतर्गत होणारी कारवाई टाळण्यासाठी परमबीर सिंह, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन उपायुक्त पराग मणेरे, सुनील जैन, संजय पुनामिया, मनोज घोटेकर यांनी ४ कोटी ६८ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अगरवाल यांचे पुतणे शरद यांनी केला होता. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
या दोन्ही प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. या विभागाच्या अधिकार्‍यांनी याप्रकरणाचा तपास केला असता, त्यामध्ये काही तथ्य आढळले नाही.
 

Related Articles