माजी आमदार संजय जगताप भाजपमध्ये प्रवेश करणार   

पुणे : विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर तालुक्यातील सर्वच जगताप समर्थक कार्यकर्ते या प्रवेशामध्ये सहभागी होणार आहेत.विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर जगताप समर्थक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आग्रह धरला होता. वेळोवेळी माजी आमदार जगताप यांनी हा आग्रह धुडकावून लावला होता. मात्र, आता प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले असून, १६ जुलैला मुंबईत प्रवेशाचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येते.
 
सद्य:स्थितीत महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे हे आमदार आहेत. तसेच भाजपमध्ये माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषदेेचे माजी सभापती बाबा जाधवराव, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर जगदाळे अशा मोठ्या नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी आहे. असे असताना माजी आमदार जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. जगताप यांनी भाजपमध्ये यावे यासाठी भाजपच्या कोणत्याही नेत्याने प्रयत्न केले नसल्याचे सांगण्यात येते. 
 
जगताप हे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, हा पक्ष कधीही भाजपपासून दूर जाऊ शकतो. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांना थोपवून धरणे अवघड जाईल. त्यातच कार्यकर्त्यांना सत्तेशिवाय टिकवून ठेवण अवघड आहे. त्यामुळे जगताप यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी भाजपला पसंद केल्याचे सांगण्यात येते.

Related Articles