संभाजी महाराजांची सृष्टी धर्मवीर गडावर उभारावी   

योगेश टिळेकर यांची मागणी; येवलेवाडी-कोंढव्यापर्यंत मेट्रो करा

पुणे : स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, बलिदान संपूर्ण देशाला प्रेरक आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराजांची सृष्टी उभी करावी. संगमेश्वरप्रमाणेच त्यांच्या गौरवशाली इतिहासाला जागवणारे स्मारक धर्मवीर गडावरही उभारावे, अशी मागणी विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांनी अधिवेशनात केली. टिळेकर यांच्या मागणीवर सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक उत्तर देत स्मारक उभारण्याबद्दल लवकरच विचार करू, असे आश्वासित केले.
 
योगेश टिळेकर यांनी पुरवणी मागण्याच्या सत्रात विविध मुद्दे मांडले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणे, हा केवळ एका स्मारकाचा नाही, तर आपल्या गौरवशाली इतिहासाच्या आदराचा आणि अभिमानाचा विषय आहे. त्यामुळे महाराजांचा सन्मान करून त्यांचा जाज्वल्य इतिहास लोकांपुढे ठेवायला हवा, असे टिळेकर यांनी नमूद केले. पुणे शहरात महाराष्ट्रातून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी येत असतात. त्यांच्या सोयीसाठी महाज्योतीचे केंद्र पुण्यात सुरू करावे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शासनाच्या जागेवर अहिल्यादेवी व सावित्रीबाई या दोन्ही मातांच्या नावाने सृष्टी उभारावी, अशीही मागणी टिळेकर यांनी केली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते खराडी या मेट्रो मार्गांच्या विस्तारासाठी मंजुरी दिली आहे. राज्याच्या अंदाजपत्रकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री अजित पवार यांनी खडकवासला, स्वारगेट, हडपसर आणि खराडी या मेट्रोसाठी ८९०० कोटींची मान्यता दिली आहे. पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळही होऊ घातले आहे. अशावेळी शिवाजीनगर ते येवलेवाडी-कोंढवा मार्गाला मंजुरी द्यावी व कात्रज ते हडपसर या दोन्ही मेट्रो  मार्गिकेचे काम सुरू करावे.
 
भैरोबा नाला ते यवत उड्डाणपूल
 
’एमएसआयडीसी’तर्फे ६५०० कोटी रुपयांच्या निधीतून चारपदरी मार्गाची निविदा प्रकाशित झाली आहे. ४० वर्षानंतर सोलापूर रस्त्याचे काम होणार आहे. हडपसर ते यवत हा १८ किलोमीटरचा उड्डाणपूल भैरोबा नाला ते यवत असा २० किलोमीटरचा करावा, अशी माझी मागणी आहे. यामुळे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित क्रीडांगण सुरु करण्यास निधी मिळावा, अशी मागणीही टिळेकर यांनी केली.
 
महंमदवाडीचे नाव महादेववाडी करा
 
पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये मुद्दा उपस्थित करत योगेश टिळेकर यांनी महंमदवाडी गावाचे नाव बदलून महादेववाडी असे करण्याची मागणी केली. गेली ३० वर्षे ग्रामस्थ महंमदवाडीचे नाव बदलण्याची मागणी करत आहेत. एकही मुस्लिम कुटुंब येथे नसल्याने १९९५ मध्ये गावाचे नाव महादेववाडी करण्यासाठी प्रस्ताव एकमताने मंजूर झाला. मात्र, १९९७ मध्ये हे गाव महापालिकेत समाविष्ट झाल्याने नामांतर रखडले. स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, शासनाने यामध्ये लक्ष घालून मंहमदवाडीचे नाव महादेववाडी करावे, अशी मागणी टिळेकर यांनी केली. 

Related Articles