पुणे जिल्हा परिषद सलग दुसर्‍या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम   

पुणे : राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी ते ८ वी शिष्यवृत्ती राज्य गुणवत्ता यादीत पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी डंका वाजवला आहे. एकूण ६८ राज्य गुणवत्ता यादी प्राप्त विद्यार्थ्यांपैकी ४७ विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेत शिकत आहेत. गेली २५ वर्षे कोल्हापूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक येण्याची परंपरा खंडीत करून पुणे जिल्हा परिषदेने सलग दुसर्‍या वर्षी राज्यात झेंडा फडकवला आहे.
 
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आणि राज्य गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. त्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. इयत्ता ५वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण ६८ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादी झळकले आहेत. ग्रामीण-३७ (१०४ पैकी), शहरी १९ (१०६ पैकी), सीबीएसइ आणि आयसीएसइ १२ (५१ पैकी) एकूण ५७ राज्य गुणवत्ता यादी प्राप्त विद्यार्थ्यांपैकी ४० विद्यार्थी हे पुणे जिल्ह्यातील खासगी अनुदानीत मराठी शाळेत शिकत आहेत.
 
पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत असलेल्या १ हजार २०३ विद्यार्थ्यांपैकी ७१० विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळांतील आहेत.गेल्या काही वर्षांपासून शिषवृत्ती परीक्षेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा प्रभाव दिसून येत आहे. प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्गातच शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेतली जाते. इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीमध्ये प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी फेब्रुवारी महिन्यातच शिक्षकांची कार्याशाळा घेऊन मार्गदर्शन केले जाते. याशिवाय तज्ज्ञ शिक्षकांकडून ऑनलाइन शिष्यवृत्ती वर्ग देखील घेतले जातात.
 
७५ ते ८० टक्के विद्यार्थी गुणवत्ता यादीत 
 
गुणवत्ता यादीमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे ७५ ते ८० टक्के विद्यार्थी झळकले आहेत. जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणारी प्रज्ञाशोध परीक्षा त्याचबरोबर सराव परीक्षा आणि शिष्यवृत्ती वर्ग घेणार्‍या शिक्षकांची कार्यशाळा तज्ज्ञ शिक्षकांचे ऑनलाइन मार्गदर्शन याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. त्याचबरोबर गुणवत्ता यादीत जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यशस्वी विद्यार्थी आणि शाळेचे अभिनंदन केले.

Related Articles