लोकशिक्षण, राष्ट्रवाद आणि पत्रकारितेवर टिळकांचे मूलगामी चिंतन   

प्रा.अमिताभ दासगुप्ता 

इंग्रजीत नवे संकलन

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. सर्वसाधारण समज असा आहे की, लोकमान्य टिळक यांचे अजरामर वाक्य - ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ प्रथम त्यांनी पुण्यातून प्रकाशित होणार्‍या केसरीत लिहिलेल्या अग्रलेखात प्रसिद्ध केले.
 
मात्र ही समजूत चुकीची आहे. हे विधान प्रथम त्यांनी १९१७ मध्ये अहमदनगर येथे झालेल्या एका जाहीर सभेत, मंडाले (ब्रह्मदेश) येथील सहा वर्षांच्या कारावासानंतर भारतात परत आल्यानंतर, एका धगधगत्या भाषणात उच्चारले होते.नंतर मात्र, हे शब्द ‘केसरी’ व इतर भारतीय प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झाले आणि टिळकांनी आपल्या अनेक भाषणांत व लेखनात त्यांचा पुनःपुन्हा वापर केल्यामुळे ते अजरामर झाले.
 
लोकमान्य टिळक यांचे निवडक निबंध व अग्रलेख (१८८६ ते १९१८ दरम्यानचे) इंग्रजीत अनुवादित करून अलीकडेच, एक ग्रंथ प्रकाशित झाला आहे. हे भाषांतर इंग्रजीचे प्राध्यापक नदिम खान आणि प्रशासकीय अधिकारी यशोधन परांडे यांनी केले आहे.
 
या ३९० पानी संग्रहास मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी प्रमुख प्रा. अरविंद गणाचारी यांची सविस्तर प्रस्तावना लाभली आहे. त्यामध्ये टिळकांचे सामाजिक-सांस्कृतिक चिंतन, विशेषतः लोकशिक्षणावरील त्यांचे विचार, आणि ब्रिटिश सत्तेच्या दडपशाहीविरुद्ध जनजागृतीसाठी त्यांनी वापरलेल्या विविध मार्गांचे विवेचन आहे.
 
या निवडक निबंधांतून टिळकांची निर्भीड, धारदार आणि तत्त्वनिष्ठ पत्रकारिता, समाजसुधारणेसाठी व शिक्षण प्रसारासाठी त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका आणि त्यांचा कठोर राष्ट्रवाद यांचे प्रत्ययकारी दर्शन घडते.
 
टिळक व त्यांच्या समकालीन मित्र गोपाळ गणेश आगरकर - जरी विचारभिन्नता होती तरी - यांनीच मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन कॉलेज सुरू केले. संग्रहात निवडलेले बहुतांश निबंध हे टिळकांनी लोकांना स्थानिक भाषांमधून मूल्याधारित शिक्षण देऊन सशक्त करण्याच्या विचारावर आधारित आहेत. त्याचबरोबर हे निबंध सामाजिक कल्याण, शेती संकट आणि स्त्रियांच्या सामाजिक स्थानावरही भाष्य करतात. काही निबंधांमधून त्यांच्या राजकीय धोरणांवर व राष्ट्रवादी विचारसरणीवर सुस्पष्ट प्रकाश पडतो.
 
या ग्रंथाची सुरुवात आधी कोण? राजकीय की सामाजिक? या निबंधाने होते. या निबंधात टिळकांनी परकीय सत्तेच्या मानसिकतेला आव्हान दिले आहे, सामाजिक सुधारणांनंतरच राजकीय स्वातंत्र्य शक्य आहे, ही चर्चा ब्रिटिशांच्या अनेक वसाहती राष्ट्रांमध्ये घडून आली आहे.यानंतरचा निबंध पूर्वेकडील लोकांचे विचारैक्य (पूर्वेकडील राष्ट्रांतील लोकांमध्ये विचारांचे ऐक्य) यामध्ये एका जपानी प्राध्यापकाच्या पुस्तकाचा संदर्भ देत पाश्चात्त्य साम्राज्यवादी शक्ती पूर्वेकडील राष्ट्रांना हावरेपणाने कशा गिळंकृत करीत आहेत, याचे विश्लेषण आहे.हे निबंध टिळकांच्या स्वावलंबनवादी, साक्षरता-आधारित आणि स्थानिक संस्कृतीशी नाते सांगणार्‍या सामाजिक न्यायविषयक दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करतात.
 
या संग्रहात ‘स्वदेशी’ आंदोलनातील टिळकांची भूमिका, त्यांच्यावर लादलेली राजद्रोहाच्या खटल्यांची मालिका आणि त्यातून उद्भवलेली मंडाले येथील सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा या सर्वांचा ऐतिहासिक दस्तऐवजासारखा उल्लेख आहे. या पुस्तकात टिळकांचे निबंध समाविष्ट आहेत, त्यांची राजकीय भाषणे नाहीत. अनुवादकांनी मूळ मराठीतील भाष्याचे अर्थगर्भत्व आणि संदर्भांची शुद्धता कायम ठेवत अत्यंत अभ्यासपूर्वक आणि प्रामाणिक भाषांतर केले आहे. ग्रंथाच्या अखेरीस ‘केसरी’त प्रसिद्ध झालेल्या काही प्रमुख व्यक्तींच्या श्रद्धांजलीपर लेखांचा समावेश आहे. तरुण वाचकांसाठी विशेषतः उपयुक्त ठरणारी गोष्ट म्हणजे शेवटी दिलेला, व्यक्ती, संज्ञा आणि घटनांवर आधारित वर्णमालेनुसार सजवलेला परिशिष्ट, जो संदर्भ मिळवण्यासाठी उपयोगी ठरतो.

पहिल्यांदा पहिले पान कोरे 

मुंबईत लोकमान्य टिळकांवर १९०८ मध्ये राजद्रोहाचा खटला सुरू झाला, तेव्हा त्यांचे समर्थक म्हणून एक तरुण वकील मैदानात उतरला - ते म्हणजे महमद अली जिना, ते आज पाकिस्तानचे जनक म्हणून ओळखले जातात.या खटल्यासाठी स्ट्रेची नामक न्यायाधीशांना मुंबई उच्च न्यायालयात  खास पदोन्नती देऊन नेमण्यात आले होते आणि त्यांना पूर्णतः गोर्‍या सदस्यांची ज्यूरी दिली गेली.
 
या खटल्यात लोकमान्य टिळक यांना दोषी ठरवले गेले आणि त्यानंतर भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच, अनेक वृत्तपत्रांनी आपल्या पहिल्या पानावर एकही बातमी न छापता केवळ एक शीर्षक दिले होते - ‘दि स्ट्रेची लॉ’. अशा प्रकारे भारतीय प्रसारमाध्यमांनी सामूहिक निषेध नोंदवला होता.

Related Articles