E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
जहाल क्रांतिकारक - यशपाल सिंह
Wrutuja pandharpure
11 Jul 2025
गाऊ त्यांना आरती, गिरीश चिटणीस
यशपाल सिंह हे जहाल क्रांतिकारक नेते होते. थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या वीर मरणानंतर वाताहत होऊन विखुरलेल्या हिंदुस्थान समाजवादी प्रजातंत्र सेना या संघटनेला एकत्र आणण्यासाठी रिपब्लिकन आर्मीची एक बैठक बोलावण्यात आली. यशपाल सिंह यांना आझादांनंतरचे दुसरे सेनापती म्हणून नियुक्त करण्यात आले. यशपाल सिंह यांच्यासंबंधी इन्स्पेक्टर हालिन्स यांनी आपला अभिप्राय ब्रिटिश शासनाला दिला. त्यात त्यांनी म्हटले होते की, आझादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या एका मित्राने लवकरच त्यांची जागा घेतली व तो आझाद यांच्यापेक्षाही अधिक साहसी व दृढनिश्चयी निघाला. गढमुक्तेश्वर येथे हा निर्णय घेण्यात आला. कमांडर इन चीफ यशपाल सिंह यांनी दहशतवादातून सार्वजनिक विद्रोहाकडे नेण्याची योजना आखली. चंद्रशेखर आझाद हे ’ह. बलराज’ या कल्पित नावाने यंत्रणा आखीत व पुढे नेत असत; पण यशपाल सिंह यांनी त्याऐवजी उघडउघड स्वतःच्याच नावाने घोषणापत्रांच्या खाली सही करण्यास प्रारंभ केला.
डेहराडूनला येऊन यशपाल यांनी आपल्या नव्या धोरणांचे स्पष्टीकरण करणारे पत्रक काढले. इंग्रज शासनाने यशपाल यांच्या नावावर वॉरंट जारी करून त्यांना पकडून देणार्यास सहस्रावधी रुपयांचे पारितोषिक घोषित केले होते. अर्थातच फरारी यशपाल यांच्या सहीचे घोषणापत्रक हे भारतभर जहाल क्रांतिकारकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय होता. ज्यामुळे जहाल क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यलढ्याच्या कारवायांसाठी पुन्हा एकदा अग्नीकुंड पेटविले. २७ फेब्रुवारी १९३१ रोजी वीरमरण पत्करलेल्या चंद्रशेखर आझाद यांच्यानंतर २३ जानेवारी १९३२ रोजी यशपाल सिंह यांना अटक होईपर्यंत त्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी जहालवादी क्रांतिकारकाच्या हिंदुस्थान समाजवादी प्रजातंत्र सेनेमार्फत दिलेल्या योगदानाने स्वातंत्र्यलढ्याला प्रचंड बळ मिळाले. यशपाल सिंह यांच्यावर खटला चालून त्यांना चौदा वर्षांची शिक्षा झाली.
विनाअट मुक्तता
संयुक्त प्रांतात गोविंद वल्लभ पंत यांच्या नेतृत्वाखाली प्रस्थापित झालेल्या काँग्रेस सरकारने यशपाल सिंह यांची २ मार्च १९३८ रोजी तुरुंगातून विनाअट मुक्तता केली. हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मीचा हा दुसरा सेनापती पकडला जाईपर्यंत अनेक दहशतवादी घटना सार्या देशभर सुरू झाल्या. त्यात अनेक कट फुटले व अनेकांना वधस्तंभावर लटकण्यापासून ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षा झाल्या. ८ ऑगस्ट १९३० ला झाशीच्या कमिशनरला बॉम्बने उडवून देण्याच्या प्रयत्नात यशपाल यांचा सहभाग होता. यामध्ये पंडित लक्ष्मीकांत शुक्ल यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. १६ नोव्हेंबर १९३१ ला गुजराणवाला येथे बॉम्बचा मोठा धडाका उडाला. २६ नोव्हेंबर १९३० रोजी पाटणा येथे असाच बॉम्बचा धडाका उडाला. नोव्हेंबर १९३० मध्ये कराची येथे पोलीस चौकीवरच तीन बॉम्बगोळे फेकण्यात आले. केवळ भारतातच नव्हे, तर ब्रह्मदेशापर्यंत या दहशतवादी घटनांचा विस्तार झालेला होता. सर्वश्रेष्ठ घटना म्हणजे क्रांतिकारकांनी बंगालमध्ये चितगाँगच्या शस्त्रागारावर १८ एप्रिल १९३० रोजी केलेला हल्ला होय.
यशपाल सिंह यांनी तुरुंगवासानंतर आपला संपूर्ण भर लेखनावर दिला. त्यांनी कथा, कादंबर्या, निबंध, आत्मचरित्र, नाटके यामधून भारताच्या सामाजिक, राजकीय आणि क्रांतिकारी संघर्षाचे वास्तव चित्रण केले. यशपाल यांचे लिखाण स्वातंत्र्योत्तर भारतात ’क्रांतिकारक विचारांची साहित्यिक अभिव्यक्ती’ मानले गेले. यशपाल यांची लेखनशैली साधी, स्पष्ट पण अत्यंत प्रभावशाली होती. त्यांनी कोणत्याही सामाजिक किंवा राजकीय विषयावर लिहिताना कोणतीही भीती न बाळगता परखड मते मांडली. त्यांच्या लेखनात प्रामाणिकपणा आणि अनुभवातून आलेली परखडता दिसून येते. १९७० मध्ये यशपाल सिंह यांना भारत सरकारने ’पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार आणि सोव्हिएत लँड पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. यशपाल सिंह हे समाजवादी विचारसरणीचे प्रणेते होते. त्यांच्या लेखनातून क्रांतीची ऊर्जा, शोषणाविरुद्ध आवाज आणि समाजबदलाचे स्वप्न प्रकर्षाने जाणवले. २६ डिसेंबर १९७६ रोजी त्यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले.
सशस्त्र क्रांतीमध्ये सहभाग
यशपाल सिंह यांचा जन्म ३ डिसेंबर १९०३ रोजी उत्तर प्रदेशमधील फिरोजपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हीरालाल तर आईचे नाव प्रेमदेवी. यशपाल यांना आर्य समाजाचा प्रचारक बनविण्यासाठी ’गुरुकुल कांगडी’ येथे पाठविण्यात आले. या गुरुकुलामध्ये जे राष्ट्रीय वातावरण निर्माण होते, त्यामुळे यशपाल यांची दृष्टी इंग्रज शासनाविरुद्ध लढण्यासाठी तयार झाली. यानंतर लाहोर येथे नॅशनल कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी ते दाखल झाले. या कॉलेज जीवनात त्यांचा परिचय भगतसिंह आणि सुखदेव या क्रांतियोद्ध्यांशी झाला आणि ते जहाल क्रांतिकार्याकडे मनाने ओढले गेले. १९२१ नंतर म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षानंतर ते सशस्त्र क्रांती आंदोलनात भाग घेऊ लागले. भगतसिंह पर्वात धरपकडीचे जे सत्र सुरू झाले त्यांत या सेनेचे बहुतेक महत्त्वाचे कार्यकर्ते व विशेषतः सुखदेवसारख्या संघटनाकुशल व्यक्ती हातच्या गेल्यामुळे सेनापती चंद्रशेखर आझाद यांनी हिंदुस्थान समाजवादी प्रजातंत्र सेनेचे पुनःसंघटन करून भगवतीचरण बोहरा व यशपाल सिंह यांच्यावर क्रांतियुद्धाचा महत्त्वाचा भार सोपविला. भगवतीचरण यांच्या पत्नी दुर्गादेवी या भगतसिंह प्रकरणापासूनच प्रत्यक्ष क्रांतिकार्यात भाग घेऊ लागल्या होत्या. त्या, श्रीमती सुशीलादेवी, यशपाल सिंह यांची बहीण प्रेमवती या हिंदुस्तान समाजवादी प्रजातंत्र सेनेच्या सदस्या होत्या. सुखदेव यांच्या धरपकडीनंतर यशपाल सिंह हे गुप्त झाले. भगवतीचरण त्यापूर्वीपासूनच अज्ञातवासात कोलकाता येथे राहात होते. सुखदेव हे पंजाब प्रांतातील क्रांतिकार्याचे सूत्रधार असल्यामुळे यशपाल यांना स्वतंत्रपणे काम सुरू करण्यासाठी म्हणून त्यांनी मोठ्या धाडसाने तुरुंगात एका बॅरिस्टरचा वेष घालून सुखदेव यांची भेट घेतली. सुखदेव त्यावेळी अन्नसत्याग्रह करीत होते.
बॉम्बचे प्रशिक्षण
संयुक्त प्रांतातील कार्यकर्त्यांशी संबंध जोडण्याचे सूत्र म्हणून प्रभात या गुप्त नावाने वावरणार्या शिव वर्माचा पत्ता यशपाल यांना सुखदेव यांनी सांगितला. शेवटी निराश झालेल्या अज्ञातवासातील यशपालने भगवतीचरण बोहरा यांना गाठले. यशपाल यांनी बॉम्ब तयार करण्याचे संशोधन जे केले होते ते भगवतीचरण यांना दाखविले. कोलकात्याच्या पुढार्यांशी गूढतेमुळे जमण्यासारखे नाही असे पाहून दोघेही आपल्या कार्यक्षेत्रात आले. त्यांनी बॉम्बचा उपयोग जम्मू येथे करून पाहिला, पण मोठा धडाका होऊन उपयोग न झाल्याने यशपाल यांनी रोहतक येथे राहून अडाणी नोकराच्या वेषात बॉम्ब तयार करण्यात यश मिळविले. देशातील सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी व्हाइसरॉय त्यालाच त्याच्या गाडीसहीत बॉम्बस्फोटने उडवून ख्रिस्तवासी करण्याची कल्पना निश्चित करण्यात आली. यशपाल यांनी नियत दिनांकाला विजेच्या साहाय्याने धडधडत दिल्लीला जाणार्या व्हाईसरॉय आयर्विन यांच्या रेल्वे गाडीवर बॉम्ब फेकलाच. हा बॉम्ब व्हॉइसरॉयची गाडी येणार्या रूळाखाली गाडलेला होता. विजेची तार त्याला जोडून ती रेल्वेलाइनपासून २०० यार्ड अंतरावर एका बॅटरीशी जोडलेली होती. निजामुद्दीन स्टेशनच्या पलीकडे गाडी जाताच स्विच दाबण्यात आला. तोफेसारखा प्रचंड आवाज होऊन स्फोट झाला; पण व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन हे दुसर्या डब्यात असल्याने वाचले. त्यांच्या स्पेशल जेवणाच्या डब्याखाली बॉम्ब उडाला आणि डबा हवेत उडून त्याच्या ठिकर्या उडाल्या. त्या दिवशी धुके होते म्हणूनच व्हाइसरॉय वाचले.
इंग्रज शासन हादरले. यशपाल सिंह, चंद्रशेखर आझाद यांच्यानंतर हिंदुस्थान समाजवादी प्रजातंत्र सेनेचे सेनापती झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या नावाने भारतभर घोषणापत्रक जाहीर केले. त्यात ते म्हणतात... हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे सामर्थ्य ठिकठिकाणी विखुरलेल्या काही सशस्त्र तरुणांच्या टोळीतच नाही तर स्वदेशातील ज्या कोट्यवधी लोकांच्या हृदयात इंग्रजी राजसत्तेच्या अत्याचाराविरुद्ध आग भडकलेली आहे व स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्याची शक्ति विद्यमान आहे, त्या सर्वांत आहे. स्वदेशाचे शत्रू असलेल्या शत्रूची सेवा करणे व त्याला साहाय्य करणे या गोष्टीला कर्तव्य समजणे हा अत्यंत मोठा देशद्रोह आहे. केवळ आपले पोट जाळण्यासाठी असा देशद्रोह करणार्या मनुष्याला शिक्षा देण्याचा अधिकार प्रत्येक स्वदेशभक्ताला आहे. आमचे साध्य स्वकीय व परकीय शोषणवाद नष्ट करणे हा आहे. परिश्रम करणार्या सर्वांना आत्मनिर्णयाचा अधिकार प्राप्त करून देण्याचा आमचा उद्देश आहे. अशी एक व्यवस्था आम्ही उत्पन्न करू इच्छितो, की जेथे सर्व स्त्री-पुरुषांना समान अधिकाराने आपले वेतन मिळविण्याची, विकास करण्याची व आपल्या परिश्रमांचे पूर्ण फळ प्राप्त करून घेण्याची संधी असेल. एका बाजूला सरकारच्या वतीने यशपालचा फोटो देऊन सहस्रावधी रुपयांचे त्याला पकडून देण्याविषयी पारितोषिक लिहिलेला जाहीरनामा लटकत होता, तर दुसरीकडे यशपालचे हे घोषणापत्रक लटकत होते.
२३ जानेवारी १९३२ रोजी सकाळी साडेचार वाजता तुफान मेलने यशपाल सिंह अलाहाबादला आले. या स्टेशनवर गुप्तहेरांनी त्यांना ओळखले व त्यांचा पाठलाग करीत पोलीस सुपरिटेंडेट डी. पिल्डीच यांनी निवासस्थानाला वेढा देत त्यांना शरण येण्यास भाग पाडले. यशपाल यांच्या अटकेचे महत्त्व इतके मोठे होते की, सम्राटाचे खास पदक पिल्डीच यांना देण्यात आले. बॅरिस्टर जाफरअल्लींची परित्यक्त्या आयरिश पत्नी सावित्रीदेवी यांच्याकडे ते उतरले होते. त्यांनाही खटला चालून ५ वर्षांची शिक्षा झाली. यशपाल सिंह यांना १४ वर्षांची शिक्षा झाली. यशपाल यांच्या सहकारी श्रीमती प्रकाशवती कपूर यांनी दिनांक २० ऑगस्ट १९३६ रोजी यशपाल यांच्याशी ते तुरुंगात असतानाच त्यांच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह केला. वस्तुतः प्रकाशवती व यशपाल यांचा प्रेमविवाह यापूर्वीच झालेला होता.
कर्मयोगीचे संपादक
यशपाल सिंह तुरुंगात असतानाच कथा लिहित होते. या कथा स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देणार्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिद्ध होत होत्या. तुरुंगातून त्यांची सुटका झाल्यानंतर ’पिंजडे की उडान’ या नावाने पहिला कथासंग्रह प्रकाशित केला. काही काळ त्यांनी ’कर्मयोगी’ पत्रिकेसाठी काम केले. त्यानंतर ’विप्लव’ नावाचे स्वतःचे पत्रक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. इंग्रज शासनाच्या दबावामुळे हे पत्रक बंद करण्यात आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा हे पत्रक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. १९४१ मध्ये त्यांनी ’कार्यालय’ नावाची प्रकाशन संस्था निर्माण केली. त्यांची पहिली कादंबरी ’दादा कॉमरेड’ १९४१ मध्ये तर ’देशद्रोही’ कादंबरी १९४३ मध्ये प्रकाशित झाली. १९४९ मध्ये उत्तर प्रदेश सरकारने कम्युनिस्टांची धोरणे यशपाल सिंह राबवितात म्हणून त्यांना अटक केली; पण लोकांच्या दबावामुळे त्यांना सोडून द्यावे लागले. प्रेमचंद यांची परंपरा पुढे नेणार्या यशपाल सिंह या साहित्यिकाने शहरी समाजातील सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून लिखाण केले. भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांच्यासह इतरांबरोबर काम करीत संघटनेचे सेनापती होऊन त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात केलेले कार्य असामान्य. त्यांचे जीवन अनेक रोमहर्षक घटनांनी भरलेले आहे. त्यांच्या जीवनाचे काव्य प्रेरणादायी आहे. सिंहावलोकन या नावाखाली त्यांनी हिंदी भाषेत आपली त्रिखंडात्मक आत्मकथा लिहिलेली आहे. ज्यामुळे स्वातंत्र्यलढ्यातील समर्पण करणार्या स्वातंत्र्यसैनिकांची कहाणी आपल्यापर्यंत सहजपणे सविस्तर पोहोचली.
Related
Articles
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा
21 Jul 2025
जुलैमध्ये गाझात कुपोषणाचे ४८ बळी
26 Jul 2025
झारखंडच्या धरणात चार तरुण बुडाले
26 Jul 2025
जन्मशताब्दीनिमित्त गुरु दत्त यांचे चित्रपट देशभर होणार प्रदर्शित
20 Jul 2025
कृषीमंत्र्यांचा मोबाइलवर रमीचा डाव
21 Jul 2025
दीडशेहून अधिक ग्राहकांची १८ कोटी रुपयांची फसवणूक
26 Jul 2025
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा
21 Jul 2025
जुलैमध्ये गाझात कुपोषणाचे ४८ बळी
26 Jul 2025
झारखंडच्या धरणात चार तरुण बुडाले
26 Jul 2025
जन्मशताब्दीनिमित्त गुरु दत्त यांचे चित्रपट देशभर होणार प्रदर्शित
20 Jul 2025
कृषीमंत्र्यांचा मोबाइलवर रमीचा डाव
21 Jul 2025
दीडशेहून अधिक ग्राहकांची १८ कोटी रुपयांची फसवणूक
26 Jul 2025
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा
21 Jul 2025
जुलैमध्ये गाझात कुपोषणाचे ४८ बळी
26 Jul 2025
झारखंडच्या धरणात चार तरुण बुडाले
26 Jul 2025
जन्मशताब्दीनिमित्त गुरु दत्त यांचे चित्रपट देशभर होणार प्रदर्शित
20 Jul 2025
कृषीमंत्र्यांचा मोबाइलवर रमीचा डाव
21 Jul 2025
दीडशेहून अधिक ग्राहकांची १८ कोटी रुपयांची फसवणूक
26 Jul 2025
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा
21 Jul 2025
जुलैमध्ये गाझात कुपोषणाचे ४८ बळी
26 Jul 2025
झारखंडच्या धरणात चार तरुण बुडाले
26 Jul 2025
जन्मशताब्दीनिमित्त गुरु दत्त यांचे चित्रपट देशभर होणार प्रदर्शित
20 Jul 2025
कृषीमंत्र्यांचा मोबाइलवर रमीचा डाव
21 Jul 2025
दीडशेहून अधिक ग्राहकांची १८ कोटी रुपयांची फसवणूक
26 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर