आमदार गायकवाड यांची कॅन्टीन कर्मचार्‍यास मारहाण   

मुंबई, (प्रतिनिधी) : मंत्रालया शेजारील आमदार निवासाच्या उपहारगृहात शिळे अन्न दिल्याच्या कारणावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचार्‍याला मारहाण केली. या मारहाणीचे पडसाद  बुधवारी विधान परिषदेत उमटले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आक्रमक भूमिका घेत दादागिरी करणार्‍या अशा आमदाराचा बंदोबस्त करण्याची  मागणी केली. तर, लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे भूषणावह नाही. यामुळे विधिमंडळाची आणि आमदार म्हणून सर्वांची प्रतिष्ठा कमी होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, विधानसभेचे अध्यक्ष आणि  विधान परिषदेचे सभापती यांनी या घटनेची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही  फडणवीस यांनी केली. गायकवाड यांनी निकृष्ट अन्नपुरवठा करणार्‍याला असाच धडा शिकवणे आवश्यक होते व आपल्याला याचा अजिबात पश्चात्ताप नसल्याचे सांगितले.
 
निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्याचा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी मंगळवारी रात्री  उपहारगृहातील कर्मचार्‍याला जबर मारहाण केली. समाज माध्यमातून या मारहाणीची चित्रफित प्रसिद्ध झाली. परब यांनी काल विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. सरकारमधील एक आमदार बनियान-टॉवेलवर येऊन एका गरीब कर्मचार्‍यांना मारहाण करतो. आमदारांनी कसे राहावे, याचे काही संकेत आहेत की नाही. हे गल्लीतील लोक आहेत का? यामुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का लागतो, असे सांगत अशा लोकांचा तुम्ही पाठिंबा घेणार काय, अशा लोकांच्या पाठिंब्यावर सरकार चालवणार का? असा सवाल परब यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला. आमदार निवास विधिमंडळाच्या कार्यकक्षेत येते. विधिमंडळात लोकप्रतिनिधीने कुणाला मारहाण केली तर तुम्ही त्याला निलंबित करता. त्यामुळे या आमदाराचे निलंबन किंवा बडतर्फ करून असे प्रकार खपवून घेणार नाही असे संदेश जनतेला द्या, अशी मागणी परब यांनी फडणवीसांकडे केली.
 
गायकवाड यांची चित्रफित आपण पाहिली आहे. अशा प्रकारचे वर्तन विधिमंडळ सदस्यास भूषणावह  नाही. यामुळे विधिमंडळाची  प्रतिष्ठा, प्रतिमा कमी होते. आमदार निवासात सोयी-सुविधा नाहीत, अशी नाराजी व्यक्त केली जात आहे. अशावेळी तक्रार करावी. आमदार निवासात काही अनियमितता होत असेल आणि तेथे चुकीच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर स्वतंत्रपणे त्याची कारवाई झाली पाहिजे. पण, लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे चुकीचे आहे. यातून आपण सत्तेचा गैरवापर करीत असल्याबद्दल लोकांमध्ये चुकीच्या भावना पसरल्या जातात आणि अशा गोष्टी गंभीर आहेत. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांनी याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, असे फडणवीस यांनी सांगितले. 
 
गायकवाड यांच्यावर कारवाई करा
 
आमदार निवास उपहारगृहातील  कर्मचार्‍याला मारहाण करणारे आमदार गायकवाड यांचा हा काही पहिलाच प्रकार नाही. हे महाशय वारंवार दादागिरी करतात.  महापुरुषांचा अपमान करणे, शिविगाळ करणे, धमकी देणे असे प्रताप ते सतत करत असतात. अशा प्रवृत्तीच्या आमदाराला पक्ष तरी कसा पाठीशी घालतो, असा सवाल करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी  गायकवाड यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
 
एकनाथ शिंदेंकडून कडक समज
 
उपहारगृहातील कर्मचार्‍याला  मारहाण केल्याबद्दल आमदार संजय गायकवाड यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दांत समज दिली आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने रीतसर तक्रार करता आली असती. त्यामुळे केलेली मारहाण समर्थनीय नाही, असे शिंदे यांनी  स्पष्ट केले. संजय गायकवाड यांना आमदार निवास उपहारगृहातील  निकृष्ट जेवण खाल्ल्याने उलटी झाली होती. इतरांना त्रास होऊ नये यासाठी त्यांनी त्वरित उपहारगृहात  धाव घेत अन्नाच्या दर्जाबाबत चौकशी केली. लोकप्रतिनिधी या नात्याने अन्नाच्या दर्जाबाबत रीतसर तक्रारी करून त्यावर कायदेशीर कारवाई करता येऊ शकते. पण, त्यावर  मारहाण करणे हा पर्याय असू शकत नाही. गायकवाड यांना समज दिली असून आम्ही याचे समर्थन करत नाही, असेही शिंदे म्हणाले.

Related Articles