शिक्षकांच्या आंदोलनाला यश   

२० टक्के वाढीव पगार खात्यात होणार जमा; गिरीश महाजन यांची घोषणा

मुंबई : आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला यश मिळाले असून, विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात २० टक्के वाढीव पगार जमा होईल, असे आश्वासन सरकारकडून येईल, अशी घोषणा आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनात जाऊन मंत्री गिरीश महाजन यांनी केली. इथून पुढे पगाराची तारीख टळणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
 
याआधी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत  सकारात्मक चर्चा झाल्याचे महाजन यांनी सांगितले. सकाळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी आझाद मैदानात जाऊन शिक्षकांची भेट घेतली होती. राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना देण्यात आलेले आश्वासन सरकारने पूर्ण करावे, शाळांना २० टक्के टप्प्याटप्याने अनुदान यासह इतर मागण्यांसाठी शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. आपल्या मागणीसाठी शिक्षक आक्रमक होताच सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
 
यापुढे पगाराची तारीख टळणार नाही
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिक्षकांसंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मात्र, थोड्या आर्थिक अडचणींमुळे मधल्या काही काळातील हफ्ते देण्यास उशीर झाला. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कुणावरही विश्वास ठेऊ नका, तुमचे काम आम्हीच करणार आहोत. येथून पुढे पगाराची तारीख टळणार नाही. पुढे हा पगार नियमितपणे तुमच्या खात्यात जमा होईल.
 
राज्यामध्ये सध्या पाच हजार ८४४ अंशतः अनुदानित खासगी शाळा आहेत. यामध्ये ८२० प्राथमिक, एक हजार ९८४ माध्यमिक व तीन हजार ०४० उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण तीन हजार ५१३ प्राथमिक, दोन हजार ३८० माध्यमिक व तीन हजार ०४३ उच्च माध्यमिक तुकड्या कार्यरत आहेत. एकूण आठ हजार ६०२ प्राथमिक शिक्षक, २४ हजार ०२८ माध्यमिक शिक्षक आणि १६ हजार ९३२ उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या शाळांमध्ये कार्यरत आहेत.
 
काय होत्या मागण्या?
 
राज्यातील सुमारे पाच हजार खासगी विना अनुदानित शाळांना टप्प्याटप्याने अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर २०२४ मधील अधिवेशनात घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर १० महिने उलटूनही अद्याप निधीची कोणतीही तरतूद सरकारने केली नाही. या पार्श्वभूमीवर ८ व ९ जुलै रोजी राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचसोबत शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले.
 
अधिवेशन संपताच पैसे खात्यावर होणार जमा
 
यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, १८ तारखेला पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर  तुमच्या खात्यात २० टक्के वाढीव पगार जमा झालेला असेल. मुख्यमंत्री हे शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहेत.

Related Articles