राजगुरुनगर-वाफगाव रस्त्याची दुरवस्था   

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

राजगुरूनगर, (वार्ताहर) : राजगुरुनगर-वाफगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून या मार्गावरील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम अर्धवट राहिले आहे. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने हा रस्ता खड्डेमय व चिखलमय झाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी राडारोडा, खोल खड्डे व साचलेले पाणी यामुळे वाहनचालकांना अत्यंत त्रासदायक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांच्या बेपर्वाईमुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते अमर बोर्‍हाडे यांनी याबाबत बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला असून दखल न घेतल्यास, पूर्वभागातील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत, असे बोर्‍हाडे यांनी सांगितले.
 
या रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले. मात्र, निकृष्ट दर्जाचा मातीमिश्रित मुरूम वापरल्याने आणि काम पावसाळ्यात अपूर्ण ठेवल्याने रस्त्याची खड्डे पडून चाळण झाली आहे. मातीमिश्रित मुरूम, पाणी निचर्‍याची व्यवस्था नसल्याने चिखलमय रस्त्यावर दररोज लहानमोठे अपघात होत आहेत.काम चालू असल्याचा कोणताही सूचनाफलक लावलेला नाही. रस्त्याच्या खोदलेल्या भागाजवळ संरक्षक कठडे लावले नाहीत. घाटाजवळ काही ठिकाणी १० ते १५ फूट खोल खड्डे खोदण्यात आले असून, त्यात पावसाचे पाणी साचून तळी निर्माण झाली आहेत. रात्रीच्या वेळी या भागातून प्रवास करणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. या प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

Related Articles