छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधारगृहाची मान्यता रद्द करणार   

मुंबई  : छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधारगृहात मुलींवर विविध प्रकारचे अत्याचार होत असल्याने त्या बालसुधारगृहाची मान्यता रद्द करण्यात येईल. त्या बालसुधारगृहाची मुदत संपत आली असेल तर त्याला कोणत्याही प्रकारे मुदत वाढवून देण्यात येणार नाही आणि संपली असेल तर त्याला पुन्हा मुदतवाढ देण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच, त्यात जे-जे दोषी असतील त्यांच्यावर निलंबनाची आणि बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
 
संभाजीनगरचे विद्यादीप बालसुधारगृहातून ९ मुली २० जून रोजी पळून गेल्या. त्यानंतर आणखी  चार मुली ३० जून रोजी अत्याचाराला कंटाळून पळून गेल्या. बाल सुधारगृहाला याची कोणतीही माहिती नव्हती. शेख नावाची व्यक्ती या बालसुधारगृहात नातेवाईक असल्याचे सांगत सातत्याने येत होता आणि अत्याचार करत होता. या मुलींवर अधीक्षिकेचे लक्षच नव्हते. या मुलींना एकमेकींचा आधार होता. त्यामुळे बालकल्याण अधिकार्‍याला तात्काळ बडतर्फ करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. 
 
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हा बालविकास अधिकार्‍यावर कारवाईची मागणी केली. केंद्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. या संस्थेची मान्यतेची मुदत मागील वर्षी संपलेली आहे. तरी तेथे अद्याप ८० मुली आहेत. या संस्थाचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल होण्याची, त्यांना तुरुंगात टाकण्याची गरज आहे, अशी संतप्त मागणी दानवे यांनी केली.
 
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही अतिशय गंभीर घटना आहे. ज्या अनियमितता बाहेर आल्या आहेत त्या भयानक आहेत. त्यामुळे जिल्हा बालविकास अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करण्यात येईल. त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या तीन वरिष्ठ महिला पोलिस अधिकार्‍यांच्या समितीने मुलींशी चर्चा केली. त्यातून अनेक गंभीर गोष्टी बाहेर आल्यामुळे यासंबंधात अधीक्षक आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Related Articles