तालिबान नेत्यांविरुद्ध आयसीसीचे अटक वॉरंट   

महिलांवरील अत्याचाराचे आरोप 

काबुल : आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने तालिबानचे सर्वोच्च नेता हिबतुल्ल  अखुंदजादा आणि अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख अब्दुल हकीम हक्कानी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. सत्ता हाती घेतल्यापासून जवळपास चार वर्षे त्यांनी तालिबानच्या कठोर लिंग धोरणांना विरोध करणार्‍या महिला आणि मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्याखाली त्यांच्याविरोधात हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. तालिबानच्या सर्वोच्च नेतृत्वाविरुद्ध आयसीसीने असे कायदेशीर पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ आहे. 
 
आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हुकूम आणि आदेशांद्वारे तालिबानने मुली आणि महिलांना शिक्षण, गोपनीयता, धार्मिक अभिव्यक्ती आणि कौटुंबिक जीवनाच्या अधिकारांपासून वंचित ठेवले आहे. ही गंभीर बाब आहे. याशिवाय तालिबानच्या लिंग धोरणाचे पालन न करणार्‍या इतर व्यक्तींना देखील लक्ष्य करण्यात आले आहे. 
 
सोमवारी संयुक्त राष्ट्रांनी तालिबानला महिला आणि मुलींवरील वाढत्या अत्याचारांना थांबवण्याचे आणि सर्व दहशतवादी संघटनांना नष्ट करण्याचे आवाहन करणारा ठराव मंजूर केल्यानंतर काही तासांतच हे वॉरंट आले. तालिबान नेत्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी होण्यापूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह इतर नेत्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा सत्तेत आल्यापासून तालिबानने कठोर पावले उचलली आहेत. महिलांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास आणि मुलींना सहावीच्या पुढे शाळेत जाण्यास बंदी घातली आहे. 
 
दरम्यान, ही कारवाई आयसीसीच्या उद्देशाचा एक भाग आहे ज्याचा उद्देश असुरक्षित घटकांविरुद्ध गंभीर आणि पद्धतशीर मानवी हक्कांचे उल्लंघन रोखणे आहे. आयसीसीला अटक करण्याचा अधिकार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.
 

Related Articles