पुण्यातील सर्व मिळकतधारकांना ४० टक्के करसवलत द्या   

आमदार हेमंत रासने यांची मागणी

विजय चव्हाण
 
मुंबई : पुणे महापालिकेकडून सध्या मूळ मालक स्वतः राहत असलेल्या मिळकतींवर ४० टक्के कर सवलत दिली जाते. मात्र, त्या मिळकतीत भाडेकरू राहत असल्यास ही सवलत रद्द केली जाते. हा दूजाभाव न करता सर्व मिळकतधारकांना सरसकट ४० टक्के करसवलत मिळावी, अशी मागणी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी बुधवारी विधानसभा सभागृहात केली. नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान रासने बोलत होते. 
 
पुणे शहराचे गावठाण असणार्‍या कसबा मतदारसंघात अनेक जुने वाडे असून युडीसीपीआर नियमावलीतील एक मीटर साईड मार्जिनच्या अटींमुळे पुनर्विकासात अडथळे येत आहेत. या नियमात तातडीने शिथिलता देऊन जुन्या वाड्यांचा पुनर्विकास मार्गी लावणे गरजेचे आहे. मेट्रोच्या टीओडी झोनमधील वाहतूक आराखडा, टीडीआर प्रक्रिया, बांधकाम परवानग्या व पुनर्विकास नियम यामध्ये सुधारणा करून तातडीने एसओपी जारी करावी, अशी मागणी देखील यावेळी रासने यांनी केली आहे.
 
पिंपरी-चिंचवड शहरात टीडीआर केवळ दोन महिन्यांत दिला जातो. तर, पुण्यात त्यासाठी तब्बल दोन वर्षे लागत असल्याचे यावेळी रासने यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. कसबा मतदारसंघात असणार्‍या ४४ शासकीय वसाहतींची दुरवस्था झाली असून, निधीच्या अभावामुळे त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही यावी रासने यांनी केली.

Related Articles