ऋषी सुनक आता करणार नोकरी   

लंडन : ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक आता राजकारणातून बाजूला होऊन नोकरी करणार आहेत. प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट बँक गोल्डमॅन सॅक्स ग्रुप इंक कंपनीमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून ते काम करणार आहेत. गोल्डमॅन सॅक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हीड सोलोमन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.  
 
मागील वर्षी संसदीय निवडणुकीत कंजरवेटिव्ह पक्षाचा पराभव झाल्यानंतर सुनक यांना इंग्लंडच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.  पराभवानंतर त्यांनी राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवले होते. २००१ ते २००४ दरम्यान त्यांनी गोल्डमॅन सॅक्समध्ये समर इंटर्न आणि कनिष्ठ विश्लेषक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती. आता ते गोल्डमॅन सॅक्समधील नोकरीसह ऑक्सफोर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठांमध्येही काम करणार आहेत. सुनक यांच्यासाठी ही भूमिका एक प्रकारे स्वगृही परतण्यासारखी आहे. ऋषी सुनक हे कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनासोबत मिळून जागतिक पातळीवरील ग्राहकांना सल्ला देतील. विशेषकरून भू-राजकीय आणि आर्थिक बाबींवर ते आपला दृष्टिकोन आणि अनुभवांची ग्राहकांसोबत देवाण-घेवाण करतील. 
 
दरम्यान, सुनक यांनी २०१५ मध्ये खासदार म्हणून ब्रिटनच्या राजकारणात पाऊल ठेवले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२० ते जुलै २०२२ या काळात त्यांनी ब्रिटनचे वित्तमंत्रिपद सांभाळले होेते. ऑक्टोबर २०२२ ते जुलै २०२४ या काळात ते ब्रिटनचे पंतप्रधान राहिले. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सुनक यांच्या पक्षाचा पराभव झाला असला तरी ते खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या पक्षाला केवळ १२१ जागा मिळाल्या होत्या. २०१९ च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने ३६५ जागा जिंकल्या होत्या. 
 

Related Articles