पुणे रिंगरोडचे काम दोन वर्षांत होणार पूर्ण   

मुंबई, (प्रतिनिधी) : सुमारे १६८ किलोमीटर लांबीच्या पुणे रिंग रोडचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत बुधवारी एका लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. भाजपच्या राहुल कुल आणि महेश लांडगे यांनी पुणे शहरातील वाहतुकीची समस्या व विविध यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे रखडलेल्या प्रकल्पांबाबत लक्षवेधी सूचनेद्वारे चर्चा उपस्थित केली होती. कुल यांनी पुणे परिसरातील वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष वेधले. तर लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३५ लाखांच्या पुढे गेली आहे. पुणे रिंग रोड, नाशिक महामार्ग आणि बंगळुरु महामार्ग या तीन रस्त्यांवर अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याशी संबंधित या लक्षवेधीला शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले.पुणे रिंग रोड हा १६८ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. याची ९ भागात विभागणी करण्यात आली आहे. या सर्व ९ कामांचे आदेश देण्यात आले आहेत. डिसेंबर २०२७ पर्यंत पुणे रिंग रोडचे काम पूर्ण केले जाईल. पुणे ते शिरूर हा या उन्नत मार्गासह हडपसर ते यवत या मार्गाची निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात येत आहे. हडपसर ते यवत या महामार्गात मेट्रोसाठी काही रचनात्मक बदल करण्यात येतील. त्यामुळे प्रकल्पात थोडा वाढीव खर्च अपेक्षित आहे. पुणे-शिरूर ५४.५ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींची अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन प्रकल्पांच्या कामांना गती दिली जाईल. तसेच, शेतकर्‍यांना विश्वासात घेऊनच भूसंपादन केले जाईल, अशी ग्वाही भुसे यांनी दिली.

Related Articles