इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४० ठार   

खान युनूस, (गाझा पट्टी) : इस्रायलने मंगळवारी रात्री गाझा पट्टीत केलेल्या हवाई हल्ल्यात ४० पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले. यामध्ये १७ महिला आणि १० मुलांचा समावेश आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मंगळवारी संध्याकाळी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दोन दिवसांत दुसरी बैठक घेतली. गाझामधील २१ महिन्यांचे युद्ध संपुष्टात आणण्यासाठी ट्रम्प युद्धबंदीसाठी आग्रह धरत असतानाच इस्रायलने गाझावर हल्ला केला. 
 
दक्षिण गाझा शहरातील खान युनूस येथील नासेर रुग्णालयाने सांगितले की, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील १० सदस्यांचा समावेश आहे, ज्यात तीन मुले आहेत. इस्रायली लष्कराने हल्ल्याची पुष्टी केलेली नाही; परंतु गेल्या २४ तासांत १०० हून अधिक लक्ष्यांवर हल्ला केल्याचे म्हटले आहे. यामध्ये शस्त्रास्त्रांचे डेपो, बोगदे, रॉकेट लाँचर आणि कथित हमास लढाऊंचा समावेश आहे.
 
दरम्यान, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला, तेव्हा हे युद्ध सुरू झाले. त्यावेळी १ हजार २०० नागरिक मारले गेले आणि २५१ जणांना ओलिस ठेवण्यात आले होते. त्यानंतर इस्रायलने गाझामध्ये लष्करी कारवाई सुरू केली. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या मते, आतापर्यंत या युद्धात ५७ हजारहून अधिक नागरिक मारले गेले आहेत. त्यामध्ये अर्ध्याहून अधिक महिला आणि मुले आहेत.
 

Related Articles