बाजारातील टपर्‍या हटणार; विना निविदा टेंडर रद्द होणार   

 

पणनमंत्री जयकुमार रावल यांची विधानपरिषदेत घोषणा

पुणे :  फुलबाजारात प्रतीक्षायादी डावलून दिलेले परवाने, भुसार बाजार आणि फळबाजारात टाकण्यात आलेल्या टपर्‍या, तसेच विना निविदा टेंडरचे सर्व विषय रद्द करण्यात येतील तसेच यासाठी उच्चस्तरीय समिती नेमून दोन महिन्यात चौकशी पूर्ण करण्यात येईल. तसेच दोषींवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा पणनमंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी विधानपरिषदेत केली. 
 
माजी मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत तसेच भुसार बाजारातील अतिक्रमणांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. खोत म्हणाले, फुलबाजारातील प्रतीक्षायादी डावलून दिलेल्या परवान्यांची चौकशी सुरू असतानाच पुन्हा ५६ परवाने दिले आहेत. यावर कोणती कारवाई करणार, चौकशी करण्यासाठी पणन संचालक टाळाटाळ करत असल्याचा मुद्दाही खोत यांनी उपस्थित केला होता.
 
पुणे बाजार समितीचा पेट्रोलपंप हा कोणतीही निविदा न काढता चालवायला दिला आहे. हवेली तालुक्यातील पेरणे येथील दहा एकर जागा ताब्यात नसताना केवळ मोजणीसाठी तब्बल ५३ लाख रुपये खर्च केला आहे. भुसार आणि फळबाजारात असंख्य टपर्‍यांचे वाटप केले आहे यावर काय कारवाई करणार आणि मांजरी येथील उपबाजारात पणन संचालकांची कोणतीही परवानगी न घेता इमारतीची तोडफोड करून गाळ्यांची निर्मिती केली आहे. त्यावर कारवाई करण्याची मागणी खोत यांनी केली होती. तसेच बाजार समितीतील घोटाळ्याच्या तक्रारींवर काय करणार असा सवाल उपस्थित केला होता. 
 
त्यावर पणनमंत्री रावल यांनी उत्तर देताना म्हटले, बाजार आवारात संचालक मंडळाच्या काळात टाकण्यात आलेल्या टपर्‍यांवर कारवाई करायला सांगितली आहे. त्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. तेथील सगळ्या टपर्‍या काढण्याची सुचना केली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील विना ई टेंडरचे सर्व विषय रद्द केले जातील. सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक करण्यात येणार आहे़. आणि त्यानंतर अहवाल जे येईल त्यानुसार कारवाई केली जाईल असे आश्वासन रावल यांनी दिले.

Related Articles