पाकिस्तानात दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या घरांचे होणार जतन   

तीन कोटींचा निधी मंजूर 

पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतीय सरकारने बुधवारी भारतीय अभिनेते दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या मालकीच्या ऐतिहासिक इमारतींच्या जीर्णोद्धार आणि संवर्धनासाठी ३ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
 
प्रांताचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर आणि पर्यटन आणि पुरातत्व सल्लागार जाहिद खान शिनवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निधी मंजूर करण्यात आला. जागतिक बँकेच्या काइट या कार्यक्रमांतर्गत खैबर पख्तुनख्वा प्रांतात वारसा जतन आणि पर्यटन संवर्धनासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांना बैठकीत मान्यता देण्यात आली.
 
पाकिस्तान सरकारने आधीच राष्ट्रीय वारसा घोषित केलेल्या राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या ऐतिहासिक इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. खैबर पख्तुनख्वा पुरातत्व विभागाने दोन्ही अभिनेत्यांच्या जीवन आणि कारकीर्दीला समर्पित दोन्ही वास्तूंचे संग्रहालयात रूपांतर करण्याची योजना आखली आहे. १३ जुलै २०१४ रोजी तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या घरांना राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित केले होते.
 
पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. अब्दुस समद म्हणाले की, सरकार ही मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचे संग्रहालयात रूपांतर करणार आहे. त्यामध्ये दिलीप कुमार आणि राज कपूर यांचा पेशावर ते मुंबई हा प्रवास प्रदर्शित केला जाईल. एक समर्पित गॅलरी देखील त्यामध्ये समाविष्ट असेल.या घोषणेचे उद्दिष्ट ऐतिहासिक इमारतीचे विध्वंस होण्यापासून संरक्षण करणे आणि सांस्कृतिक स्थळ म्हणून तिचे जतन सुनिश्चित करणे आहे.
 

Related Articles