महावितरण कर्मचार्‍यांचा विविध मागण्यांसाठी संप   

पुणे : वीज कंपन्यांमध्ये होणारा खासगीकरणचा शिरकाव, राज्यात महातिवरणच्या वीज वितरण क्षेत्रातील समांतर वीज वितरण परवाना, वीज कामगारांना पेन्शन यासह विविध १४ मागण्यांसठी बुधवारी  विज कामगारांनी एका दिवसाचा संप पुकारला. पुण्यातील रस्ता पेठेतील महावितरणच्या कार्यालयासमोर  सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
 
महाराज्य राज्य विद्युत कर्मचारी अभियंते, अधिकारी कृती समितीच्या माध्यमातून होणाऱ्या या संपामध्ये महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांमधील वीज कामगार सहभागी झाले होते. महावितरणच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही खासगी कंपनीला वीज वितरण परवाना देऊ नये, या मागणीसाठी ४ जानेवारी २०२३ रोजी वीज कामगार संघटनांनी एकत्र येऊन संप पुकारला होता.
 
या पार्श्वभूमीवर कामगार संघटनांच्या नेत्यासोबत झालेल्या चर्चेवेळी तत्कालीन ऊर्जा व  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिन्ही वीज कंपन्या कोणत्याही प्रकारचे खासगीकरण करणार नाहीत, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याविरोधात घडत आहे. तसेच पेन्शनसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात आले. 
 
बीएसएनएल कर्मचार्‍यांचाही सहभाग
 
बीएसएनएल कर्मचार्‍यांनी देशव्यापी संपात सहभाग घेतला. पुण्यातील बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन व एनएफटीईच्या वतीने कर्मचार्‍यांनी संपात सहभाग घेतला. बीएसएनएल सहित सर्व सार्वजनिक क्षेत्रांचे सासगीकरण थांबवावे,  बीएसएनएल कमकुवत करु नका,  चांगल्या दर्जाचे ४ जी आणि ५ जी सेवा त्वरीत सुरु करा,  तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांसाठी नवीन पदोन्नती धोरण लागू करा या सह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी कॉम्रेड युसुफ जकाती, विकास कदम, संदी गुरुंजकर, उल्हास जावळेकर, आनंद मुढविकर, गणेश भोज, मंजुषा लचके आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles