पर्यटन स्थळासाठी ‘अ‍ॅप’ विकसित करणार : जितेंद्र डुडी   

पुणे : जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर नागरिकांची गर्दी होत असते तसेच शनिवार-रविवारी या सुट्टीच्या दिवशी तर गर्दीच गर्दी पर्यटन स्थळांवर पहावयास मिळते. त्यामुळे काही वेळा पर्यटन स्थळे बंद ठेवावी लागतात. यासर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशाससनाने एक अ‍ॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पर्यटनस्थळावर जाण्यासाठी स्लॉट बुक करण्याची तसेच शुल्क सुद्धा ऑनलाईन भरण्याची सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या सोयीच्या वेळेनुसार गर्दी टाळून पर्यटन स्थळी जाणे शक्य होणार आहे.
 
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील पुलावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने तो पूल पडल्याने त्या ठिकाणी चार पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला तसेच मागील आठवड्यात मुळशी येथील अंधारबन येथे एकाचवेळी काही हजार पर्यटन आल्याने गर्दी नियंत्रित करण्यासाठी अंधारबनात प्रवेश देणे टाळण्यात आले. अंधारबन हे पर्यटन स्थळ अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.
 
पुणे जिल्हा निसर्ग संपन्न आहे. या जिल्ह्यात गड किल्ले, धरणे, टेकड्या, गवताळ प्रदेश लेण्या, ऐतिहासिक वारसा स्थळे अशी पर्यटनाची अनेक स्थळे आहेत, तसेच या पर्यटन स्थळांना जोडणारी कनेक्टीव्हीटी देखील आहे. त्यामुळे राज्यांतील पर्यटकाबरोबरच परराज्य आणि परदेशातून या जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे. मात्र ही ठिकाणी कोठे आहेत, तेथे जाण्यासाठी दळणवळणाची काय सुविधा आहेत. 
 
त्या ठिकाणी निवास आणि भोजनाची काय सुविधा आहे याची एकत्रित माहिती पर्यटकांना उपलब्ध होत नाही. अनेकदा त्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अ‍ॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात १३८ पर्यटन स्थळे आहेत. त्या सर्व ठिकाणांची माहिती त्यांची वैशिष्ट्ये त्या ठिकाणी असलेल्या स्पोर्ट्स सुविधांसह सर्व माहिती देणारे अ‍ॅप विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. 
 
या विषयी माहिती देताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, पर्यटनस्थळी एकाचवेळी पर्यटकांची गर्दी उसळू नये तेथे येणार्‍या पर्यटकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात ही स्थळे नेमकी कोठे आहेत. त्यासाठी कनेक्टीव्हीटी काय उपलब्ध आहे. अशी सर्व माहिती पर्यटकांना एकाच ठिकाणी मिळावी यासाठी अ‍ॅप विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Articles