महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विलंब माफी अर्ज मंजूर   

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेने धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल केलेल्या बदल अर्जावरील विलंब माफी अर्ज सशुल्क स्वीकारण्याचा आदेश धर्मादाय उपायुक्तांनी दिला. महाराष्ट्र साहित्य परिषदेने दाखल केलेल्या बदल अर्जावर विलंब माफी देऊ नका, ही विरोधकांनी केलेली मागणी धर्मादाय उपायुक्त राजेश परदेशी यांनी नाकारली आहे.
 
महाराष्ट्र साहित्य परिषदेने कोरोना काळात घेतलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत  विद्यमान कार्यकारी मंडळाला सर्वसाधारण सभेने पाच वर्षांची मुदत वाढ दिली होती.  त्याचा बदल अर्ज परिषदेने धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल केला. कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांमुळे वेळेत बदल अर्ज दाखल करणे शक्य नव्हते. त्यामुळे विलंबाने बदल अर्ज दाखल केलेला होता. त्यासोबत विलंब माफीचा अर्जही दाखल केला होता. हा अर्ज मंजूर करु नये, अशी मागणी विरोधी वकीलांनी केली होती. त्यावर सुनावणी झाली. परिषदेची कायदेशीर बाजू यशवंत पवार यांनी मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून धर्मादाय उपायुक्त यांनी बदल अर्जाचा विलंब माफी अर्ज मंजूर केला आहे.
 
धर्मादाय उपायुक्त कायदेशीर मार्गाने सुनावणी घेत आहेत. परिषदेचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने जे काही केले आहे ते परिस्थितीनुरुप आणि कायद्याला धरुन केले आहे. परिषदेला न्यायालयात निश्चित न्याय मिळेल याची खात्री आहे. विलंब माफी अर्ज मंजूर झाल्याने पहिल्या टप्प्यात परिषदेने केलेली कार्यवाही योग्य ठरली आहे, अशी प्रतिक्रिया परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी दिली आहे.

Related Articles