सर्वोच्च न्यायालयात आणखी दोन अर्ज   

बिहारमधील मतदार यादी सुधारणा

नवी दिल्ली : बिहारमधील मतदार यादीत सुधारणा करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष मोहीम जाहीर केली आहे. या निर्णयास दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तर, न्यायालयाने अर्जावर सुनावणीस सहमती दर्शवली आहे.न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या पीठासमोर यासंदर्भातील अर्ज आधीच सुनावणीस आहे. त्यावर, आज (गुरूवारी) सुनावणी होणार आहे. या अर्जासोबतच नव्याने दाखल अर्जावर सुनावणी पार पडेल, असे न्यायालयाने सांगितले.
 
अर्शद अजमल आणि रूपेश कुमार यांनी हा अर्ज नव्याने दाखल केला आहे. या दोघांनी निवडणूक आयोगाच्या २४ जूनच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.
याच प्रकरणात राजद खासदार मनोज झा, तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा, काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाल, शरद पवार राष्ट्रवादी गटातील सुप्रिया सुळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा, समाजवादी पक्षाचे हरिंदर सिंग मलिक, शिवसेना (उद्धव ठाकरे) चे अरविंद सावंत, झारखंड मुक्ती मोर्चाचे सरफराज अहमद आणि सीपीआय (एमएल) चे दीपांकर भट्टाचार्य यांनी संयुक्तपणे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याखेरीज, पीयूसीएल, एनजीओ असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आदी संघटनांनीदेखील निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, विविध राजकीय पक्षांनी शंका उपस्थित केल्यानंतर आयोगाने काहीशी सूट नुकतीच दिली होती. 
 

Related Articles