दंतेवाड्यात १२ नक्षलवादी शरण   

दंतेवाडा : छत्तीसगढमधील दंतेवाडा जिल्ह्यात बुधवारी बारा नक्षलवादी शरण आले. त्यापैकी, नऊ जणांवर २८.५० लाखांचे सामूहिक बक्षीस होते, असे एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले.
जून २०२० पासून जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार नक्षलवादी शरण आले आहेत. त्यापैकी, २४९ नक्षलवाद्यांच्या डोक्यावर बक्षीस होते, असे दंतेवाडाचे पोलिस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितले. दोन महिलांसह १२ नक्षलवादी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) अधिकार्‍यांसमोर शरण आले, असेही ते म्हणाले.
 
शरण आलेला चंद्रण्णा ऊर्फ बुर्सू पुनेम (५२) हा नक्षलवाद्यांच्या पश्चिम बस्तर विभागाचा सक्रिय सदस्य होता. अमित ऊर्फ हिंगा बरसा (२६) हा गडचिरोली विभागाचा सदस्य होता. या दोघांच्या नावावर प्रत्येकी आठ लाखांचे बक्षीस होते. या दोघांचा सुरक्षा दलांवरील अनेक हल्ल्यात सहभाग होता. अरुणा लेकम (२५) आणि  देवा कवासी (२२) यांच्यावर अनुक्रमे ५ लाख आणि ३ लाखांचे बक्षीस होते.
 

Related Articles