शुबमन गिल,आकाशदीपची क्रमवारीत प्रगती   

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीत मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. इंग्लंडचा स्टार बॅटर जो रूट याने आपले अव्वलस्थान गमावले असून दुसरीकडे भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलनं क्रमवारीत मोठी झेप घेतली. 
 
आयसीसीच्या नव्या कसोटी क्रमवारीत, जो रुटला त्याच्या संघातील सहकारी हॅरी ब्रूकनं मागे टाकले आहे. टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेत हॅरी ब्रूकनं आपल्या फलंदाजीतील धमक दाखवून दिली. याचा त्याला क्रमवारीत मोठा फायदा झाला असून ८८६ रेटिंग पॉइंट्ससह तो आता कसोटीतील नंबर वन बॅटर ठरलाय. जो रुट ८६८ रेटिंगसह क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर आहे.
 
कसोटी क्रमवारीत फलंदाजीमध्ये न्यूझीलंडचा बॅटर केन विल्यमसन ८६७ रेटिंगसह तिसर्‍या स्थानावर कायम असून त्यापाठोपाठ यशस्वी जैस्वाल ८५८ रेटिंग पॉइंट्स मिळवत चौथ्या स्थानावर असून स्टीव्ह स्मिथ ८१३ पॉइंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल इंग्लंडच्या दौर्‍यात सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसतोय. दोन शतकांसह एका द्विशतकाच्या जोरावर भारतीय कर्णधार १५ स्थानांनी मोठी झेप घेत सहाव्या क्रमांकावर पोहचलाय. त्याच्या खात्यात सध्या ८०७ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत.
 
बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहच्या जागी खेळताना आकाश दीपनं आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवून दिली. दुसर्‍या कसोटी सामन्यात १० विकेट्स घेत त्याने भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला होता. क्रमवारीतही त्याला या कामगिरीचा फायदा झाला आहे. कसोटीतील गोलंदाजांच्या क्रमवारीत ३९ स्थानासह उंच उडी घेत तो आता ४५ व्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या खात्यात ४५२ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत. सिराज यानेही बर्मिंगहॅम कसोटीतील ७ विकेट्सच्या जोरावर क्रमवारीत ६ स्थानांनी सुधारणा करत २२ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याच्या खात्यात ६१९ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत. ८९८ रेटिंग पॉइंट्स सह जसप्रीत बुमरा कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी कायम आहे.

Related Articles