भाषेचा वाद मुद्द्यावरून गुद्द्यावर नको   

अभिजित अकोळकर 

भाषा संवादाचे प्रमुख साधन. जसा मोबाईल एक साधन असून त्याचा अतिरेक वाढला, की तो इतरांच्या त्रासाचे कारण बनतो. असाच प्रकार देशात आता भाषेवरून सुरू झाला आहे. देश मोठा असून गाव बदलले, की पाण्याची चव आणि भाषा बदलते. प्रांत बदलला, की त्यात आमूलाग्र बदल होतो. वेगळी भाषा म्हटले की, कपाळावर आठ्या उमटतात. सीमावर्ती भागात भाषेची सरमिसळ होऊन तिसरी भाषा उदयाला आल्याचे दिसते. राज्यानुसार भाषा आणि तिचा स्वाभिमान आणि अस्मितेचा प्रश्न उभा राहतो. यावर तोडगा काय काढायचा? हा मोठा प्रश्न आहे.
 
अगोदर भाषावार प्रांत रचना करून भाषेला आपण स्वातंत्र्य दिले आहे. त्यातून संवर्धन केले जाते. महाराष्ट्रात तर साहित्य संमेलने, दिवाळी अंक काढून भाषेचा गोडवा टिकवला जातो. कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराज यांचे अभंग आणि समर्थ रामदास यांच्या दासबोधने तर सर्वच भाषेच्या नागरिकांना आपलेसे केले आहे. तेथे भाषेचा अडसर येत नाही. सूर आणि संगीत कोणत्याही भाषेत आणि चांगले असेल, तर ते आत्मीयतेने ऐकले जाते. त्याचे गुणगान होते. सर्व साहित्य एकमेकांच्या भाषेत प्रकाशित झाले. यामुळे त्याचा आनंद सर्व मंडळी घेतात. याशिवाय विविध भाषेतील साहित्यिक, कवी यांचा सन्मान कोणत्याही भाषेचा असले तरी हमखास होतो. कारण ज्ञानाची कदर होते. एवढे झाल्यावरही वादळ का निर्माण होते? असा प्रश्न कायम आहे. 
 
त्रिभाषा सूत्रामुळे वाद सुरू झाला. इंग्रजी आणि मराठी शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती नवीन शिक्षण धोरणात केली.  हिंदीला दक्षिण भारतीयांचा तीव्र विरोध समजण्यासारखा आहे; पण, मराठी भाषक नागरिकांनी विरोध का करावा? कारण हिंदी मराठी भाषेच्या देवनागरी लिपीप्रमाणे लिहिली जाते. त्यामुळे ती मराठीच्या अधिक जवळची आहे. उच्चार आणि व्याकरण यात फरक आहे. खरे तर मराठी भाषक हिंदी सहज आत्मसात करू शकतो. या उलट दक्षिण आणि ईशान्य भारतातील भाषेची लिपी हिंदीचा विचार करता कित्येक कोस लांब आहे. त्यांच्यासाठी ती अवघड नक्कीच आहे. मराठी आणि अन्य भाषांतील हा फरक आहे. याचा विचार देखील मराठी माणसाने केला पाहिजे. मराठी भाषा राज्यभाषा आहे. टिकली, वाढली आणि ती बोलली पाहिजे. यात दुमत नाही. मराठी इतके समृद्ध साहित्य कोणत्याही भाषेत नसावे. हिंदीला विरोध नाही; पण सक्ती करू नका ही भूमिका काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांना मान्य आहे; पण राज्य भाषेचा प्रश्न येतो तेव्हा सर्वच आक्रमक होतात. साहित्यिक आणि राजकीय नेत्यांसाठी ही बाब एक पर्वणीच असते. भाषेवरील वादाचे आश्चर्य वाटते. सरकारने तिसरी भाषा शिकण्याचा पर्याय ठेवला, तर वाद मिटू शकतो. पण, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? कारण खुद्द मांजराने स्वतः बरोबर दुसर्‍याच्या गळ्यात भाषेची घंटा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 

एक देश, एक भाषा आणि एक लिपी

देशाला एका सूत्रात बांधण्यासाठी एक देश, एक भाषा लिपीची गरज आहे. याचा विचार केला तर हिंदी सक्ती करणे हे त्रिभाषा सूत्राचे सार असावे असे दिसते. पण ते दक्षिण भारतीय यांच्या प्रथमपासून पचनी पडत नाही. कारण लिपी वेगळी आहे. हा वाद मिटविण्यासाठी सर्वांना आपलीशी वाटणारी एखादी भाषा शोधली पाहिजे. 

काय केले पाहिजे?

सर्व भाषेतील साहित्यिक आणि विचारवंत यांनी एक राष्ट्रीय पातळीवर व्यापक परिषद घेऊन यावर सखोल चर्चा करावी. देशाची राष्ट्रभाषा ठरविण्यासाठी पुढाकार घ्यावा. या निर्णयात राजकीय मंडळी यांना कटाक्षाने दूर ठेवावे. ज्यांना विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा आणि लोकसभेतील अधिवेशनाचे काम पार पाडणे अजूनही जमलेले नाही. अधिवेशन म्हणजे गोंधळ घालण्याचे आणि एकमेकाचे वस्त्रहरण करण्याचे ठिकाण असल्याचे ते जणू मानतात. मुद्द्यावरून गुद्द्यावर येणारी ही काय लोकशाही म्हणायची का? अर्थात तुम्हीच त्यांना निवडून दिले आहे. तुमची कामे मार्गी लावण्यासाठी तुम्ही त्यांना निवडून दिले आहे, याचे भान जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत लोकशाही सुदृढ होणार नाही. एकंदरीत भाषा विषयक परिषदेतील निर्णय सर्व देशाला आणि सर्व नागरिकांना लागू असेल. यानंतर कोणताही वाद चालणार नाही. अर्थात राष्ट्रभाषा ही स्वदेशी असावी. ती इंग्रजी नसावी.

प्रकाश राज यांचे दह्याचे उदाहरण

चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक प्रकाश राज यांनी हिंदीचे कन्नडवर कसे आक्रमण होते ते स्पष्ट केले. ते म्हणाले, तुम्हाला हिंदी येते म्हणून सक्ती करता. पण, मला येत नाही त्याचे काय? मी मला आवश्यक वाटेल तेव्हा हिंदी जरूर शिकेन; पण कन्नड भाषेवर हिंदीचे कसे आक्रमण होते, याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले अमूल दह्याचे मी एक पाकीट पाहिले. त्यावर इंग्रजीत कर्ड आणि हिंदीत दही असे लिहिले होते. दोन्ही शब्दांस माझा आक्षेप नाही. पण कन्नडमध्ये दह्याला मसुरू असे म्हणतात. पण पाकीटावर तसे लिहिले नव्हते, हे जर असेच सुरू राहिले तर एखादा कन्नड भाषक ग्रामस्थ चौकशी करताना मसुरू हा शब्द वापरण्याऐवजी दही आहे का?, असे विचारू लागेल आणि कन्नड शब्द कालबाह्य होऊन दही हाच शब्द रूढ होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

मराठी शाळेत कन्नड सक्ती

महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमाप्रश्न प्रदीर्घ काळापासून सुटलेला नाही. बेळगाव, संकेश्वर, चिक्कोडी, निपाणी, बिदर, भालकी आणि कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणांनी सीमाभाग दणाणून जातो.  तेथेही भाषावाद उग्र आहे. मराठी आणि कन्नड नागरिक एकत्र राहतात; पण मराठी शाळेत कन्नडची सक्ती आहे. लिपी व भाषा वेगळी असल्याने मराठी मुलांना भाषा शिकणे अवघड होते आणि कन्नडला विरोध होतो. याचप्रमाणे कन्नडसह अन्य दक्षिण भारतीय नागरिकांचे हिंदीबाबत असेच घडते आणि ते हिंदीला विरोध करतात. अनेक वर्षे राहिलेली मराठी मंडळी कन्नड आत्मसात करतात. लिहितात आणि बोलताही. 

शुद्ध मराठी

कन्नड भाषक नागरिक मराठी लवकर आत्मसात करतात. मात्र अनेकदा दोन्ही भाषांची सरमिसळ होत ती बोलली जाते. अनेकजण दोन्ही भाषेत सहज बोलतात; पण एकमेकांच्या भाषेचा प्रभाव दिसतो. जसे पुणेरी मराठी उर्वरित भागापेक्षा सरस आणि शुद्ध असते. त्याच प्रमाणे बेळगाव आणि सीमा भाग सोडून बंगळुरुकडे गेल्यावर ऐकू येणारे कन्नड गोड आणि मंजुळ असते. सीमा भाग परिसरात हेल् काढून बोलतात. दोन्ही भाषेची भडंग ऐकता येते. अशोक सराफ यांची एका चित्रपटातील कानडी व्यक्तिरेखा आणि पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीमधील रावसाहेब यांच्या व्यक्तिरेखेचा मराठी आणि कन्नड गोंधळ ज्यांनी वाचला आणि ऐकल्यावर जो विनोद घडतो, त्याचे दर्शन सीमा भागात घडते.

Related Articles