भारत-ब्रिटन मुक्‍त व्यापार कराराची प्रक्रिया वेगात   

वृत्तवेध 

भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करार (एफटीए) कायदेशीर करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जुलैच्या अखेरीस त्यावर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल ही प्रक्रिया वेगवान करण्यासाठी एका टीमसह लंडनमध्ये होते.
 
बर्थवाल त्यांच्या दोन दिवसांच्या दौर्‍यात ब्रिटनचे व्यवसाय आणि व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स आणि इतर वरिष्ठ ब्रिटिश अधिकार्‍यांना भेटले. 2030 पर्यंत 120 अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचे लक्ष्य ठेवत भारत आणि ब्रिटनने सहा मे रोजी ‘एफटीए’ वाटाघाटी औपचारिकपणे पूर्ण केल्याची घोषणा केली. या कराराअंतर्गत, भारतातून चामडे, शूज आणि कापड यासारख्या कामगारकेंद्रित उत्पादनांच्या निर्यातीवरील शुल्क रद्द केले जाईल. त्याच वेळी ब्रिटनमधून व्हिस्की आणि कारची आयात स्वस्त होईल. 2030 पर्यंत दोन्ही अर्थव्यवस्थांमधील व्यापार दुप्पट होऊन 120 अब्ज डॉलर्स होईल. जगातील पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थांनी तीन वर्षांच्या वाटाघाटींनंतर हा करार केला. स्वाक्षरी केल्यानंतर तो सार्वजनिक केला जाईल.
 
‘एफटीए’ वर स्वाक्षरी केल्यानंतर हा करार लागू करण्यापूर्वी ब्रिटिश संसद आणि भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता घ्यावी लागेल. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी सुमारे एक वर्ष लागू शकते. अधिकार्‍यांनी सांगितले की भारताचे कायदेशीर पथकदेखील ‘एफटीए’च्या कायदेशीर मसुद्याचा आढावा घेण्यासाठी लंडनमध्ये आहे. करारावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचा संपूर्ण मजकूर सार्वजनिक केला जाईल. या महिन्याच्या सुरुवातीला, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयलदेखील लंडनमध्ये होते आणि त्यांनी जोनाथन रेनॉल्ड्स यांच्याशी ‘एफटीए’च्या अंमलबजावणीशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली.
 

Related Articles