भारतीय अ‍ॅथलेटिक्सचे नवे पर्व...   

बदलते क्रीडाविश्व , शैलेंद्र रिसबूड 

भारतीय अ‍ॅथलेटिक्स प्रगतीपथावर असताना जागतिक दर्जाची ’नीरज ’चोप्रा क्लासिक’ भालाफेक स्पर्धा देशात होणार आहे. ही भारतीय अ‍ॅथलेटिक्समधील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. अशा अनेक उच्च दर्जाच्या स्पर्धा यापुढे भारतात अपेक्षित आहेत, अशी भावना दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने व्यक्त केली. ’नीरज चोप्रा क्लासिक’ ही स्पर्धा बंगळूरुच्या कांतीरावा मैदानावर होणार असून, नामांकित खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. जागतिक संघटनेनेही या स्पर्धेत ’अ’ श्रेणीचा दर्जा दिला आहे. नीरज या स्पर्धेत सहभागी होणार आहेच, शिवाय तो या स्पर्धेचा आयोजकही आहे.
 
भविष्यात या स्पर्धेचा स्तर उंचावण्याचा माझा प्रयत्न असेल. स्पर्धेत पदके मिळविणे ही वेगळी गोष्ट आहे. मात्र, या स्पर्धेच्या माध्यमातून मी भारताला आणि भारतीय खेळाडूंना असे काही दिले आहे की यामुळे नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. मी खूप आनंदी आहे. मला स्वप्नात असल्यासारखे वाटत आहे अशी प्रतिक्रिया नीरजने व्यक्त केली. सर्व स्तरातून मिळणारा पाठिंबा, सरकारची मदत, कर्नाटक ऑलिम्पिक संघटनेचे सहकार्य, जागतिक अ‍ॅथलेटिक्सची साथ आणि प्रायोजकांच्या मदतीने मला ही स्पर्धा आणखी उच्च दर्जाची करायची आहे. 
 
जागतिक संघटनेकडून अ, ब, क श्रेणी मिळालेल्या स्पर्धा अनेक देशांत दर आठवड्याला पार पडत असतात. भारतातही मला असेच करायचे आहे. किमान चार ते सहा जागतिक दर्जाच्या स्पर्धा भारतात व्हायल्या हव्यात. त्यामुळे भारतीय खेळाडूंना संधी मिळणार आहे. देशातील क्रीडा चाहत्यांनी त्यांना खेळताना पाहायला हवे. असे झाल्यास भारतात खेळासाठी चांगले दिवस येतील असेही नीरजने स्पर्धेच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
 
यावर्षी जागतिक स्पर्धा हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे. मात्र, त्यापूर्वी अशा प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होणे माझ्यासाठी चांगलेच आहे. प्रशिक्षक यान झेलेइनी यांच्या मार्गदर्शनाखील सराव सुरू आहे. काही तांत्रिक अडचणी असून, त्यावर काम करत आहे. भालाफेक करण्यासाठी धावत असताना मला वेगावर नियंत्रण मिळवायचे आहे. काही गोष्टी बदलाव्या लागतील, तंदुरुस्तीही ठेवावी लागणार आहे. यावर काम सुरू आहे असेही नीरजने सांगितले.भारतात होणार्‍या पहिल्या नीरज चोप्रा क्लासिक (एनसी क्लासिक) भालाफेक स्पर्धेत आयोजक आणि स्पर्धक अशा दुहेरी भूमिकेत असणारा नीरज चोप्रा यालाच संभाव्य विजेता म्हणून सर्वाधिक पसंती मिळत आहे. 
 

Related Articles