माय मराठी, मावशी आणि हिंदी   

समाज मनाचा कानोसा : सुरेश मुरलीधर कोडीतकर

महाराष्ट्रात सध्या हिंदी पहिलीपासून असावी की नसावी याबाबत वादंग सुरु आहे. मुळात हा विषय  उध्दव ठाकरे प्रणित महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या कार्यकाळात सुरु केला. त्याची अंमलबजावणी सध्याचे सरकार करू पाहत होते. परंतु मराठीचे केवळ आम्हीच तारणहार आणि बाकीचे वैरी असल्याचा आव आणण्याच्या नादात उद्धव ठाकरे यांना आपल्याच जुन्या वक्तव्यांचा विसर पडला आहे. मूळात मराठीचा हा मुद्दा उसळणे, उकळणे, उफाळणे हे जाणीवपूर्वक घडवून येत आहे. कारण समाजमन हे जरी मराठी या मातेप्रति सजग, प्रेमळ असले तरी ते दुराग्रही नाही.  मराठीचा आग्रह नाही. इंग्रजीचा स्वीकार आहे. हिंदी ओठांवर रुळली आहे. अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे. तोच महाराष्ट्राचा तोंडवळा आहे. 
 
महाराष्ट्रात मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. पाचवीपासून इंग्रजी आणि हिंदी भाषा शिकवली जाते. हिंदी आणि मराठीची लिपी ही देवनागरी असल्याने लिहिण्यात फार फरक नाही. पूर्णविरामच्या ऐवजी दंड हा एक फरक आहे. हिंदी ही भाषा म्हणून शिकायला अवघड असली तरी बोलचालीला ती सोपी आहे. व्यवहारात ती सुलभ आहे. मराठी भाषा ही आपल्या घरीदारी, परिसर, कामकाज इथे सतत कानावर पडत असल्याने आणि वाचन, श्रवण, ग्रहण होत असल्याने मातृभाषेचा आपल्यावर स्वाभाविक प्रभाव आणि पगडा असतो. आपण शाळेत मराठी, हिंदी आणि इंग्रजी शिकलो. गेल्या 1 ते 2 मराठी पिढयांनी रोजच्या व्यवहारात मराठीलाच उपयोगात आणले आहे. या पिढीच्या मुलांनी इंग्रजीला आपलेसे केल्याने ही पिढी घराबाहेर हिंदी आणि इंग्रजी उपयोगात आणते आणि घरात कामचलाऊ मराठी बोलते. जुनी पिढी आजही तुलनेने कमी हिंदी बोलते. कामापुरते हिंदी, इंग्रजी येण्यात ही पिढी धन्यता अनुभवते. म्हणजेच मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषा मराठी जनांच्या अंगवळणी पडलेल्या आहेत, हे सत्य स्विकारावे लागेल. त्रिभाषा सूत्र जुने आहे. आता तर राज्य शासनाने शासन निर्णय जारी करून राज्यातील सर्व केंद्र सरकारच्या कार्यालये आणि आस्थापनांना मराठीचा वापर, मराठीतून व्यवहार करण्यास प्राधान्य देणेबाबत कळविले आहे. मराठी समाजमन हे मराठीप्रेमी असणार यात शंका नाही. पण ते मराठीच्या आग्रहास्तव टोकाची भूमिका घेणार नाही हेसुद्धा तितकंच खरं आहे.

मराठी प्रवाही कोणामुळे ?

मराठी भाषा सर्वसामान्यांनी जिवंत, वाहती, प्रवाही ठेवलेली आहे. पुढारी, व्यावसायिक, उदयोजक, कलाकार, व्हीआयपी, अधिकारी, खेळाडू, बाजारघटकांनी नाही. त्यामुळे अशा घटकांना मराठीबद्दल ममत्व असायचे कारण नाही. आज जे लोक मराठीचा पुळका आणून आपणच पाठीराखे असल्याचा आव आणत असले तरी त्यांच्या करणी आणि कथनी यात अंतर असल्याचे दिसून येते. मराठी बोलीभाषा महाराष्ट्राच्या ज्या ज्या प्रांतात अस्तित्वात आहे तिथे मराठी प्रवाही आहे. शेतकरी, मजूर, कारागीर, बलुतेदार आणि अलुतेदार, कष्टकरी, कारागीर, माथाडी, कामगार, कारकून, शिक्षक, खेडयापाडयातील लाल परीचे सेवक, तलाठी, ग्रामसेवक, गिरण आणि केशकर्तनालय, बायाबापडया, लोककलाकार, परंपरा आणि सांस्कृतिक वारसदार, मराठी वृत्तपत्रांचे सर्व राबणारे हात, दिवाळी अंक आणि समस्त मध्यमवर्गीय मराठी जनांनी ही अवीट भाषा प्रवाही ठेवली आहे. ओव्या, अभंग, विराणी, भारुड, श्लोक, म्हणी, वाक्प्रचार, निबंध, सारांश लेखन, लावणी, भूपाळी, फटका, गीत, हे सार मराठीत अर्थगर्भ आणि विपुल आहे. मराठी अशी प्रवाही आहे. धमन्यांमधून सळसळणार्‍या रुधीरदामिनीप्रमाणे. आज मराठीचे बाळकडू लाभलेले मराठी जगतात, व्यक्त होतात, अनुभवतात, मांडतात, सामावून घेतात. त्यांच्यादृष्टीने मराठी ही माय आहे.           
 
मराठी - भाषा, माणूस, हिंदी
 
महाराष्ट्रात गेले अनेक वर्षे अमराठी लोक येत आहेत. उद्योग धंदा, छोटा मोठा व्यवसाय करून आपला चरितार्थ चालवत आहेत. त्यांच्याशी संपर्क, संवाद करताना त्यांना कोणी मराठीचा आग्रह केलेला दिसून आलेला नाही. उलट समोरचा हिंदी बोलत असेल तर मराठी माणसाने तोडके मोडके हिंदी बोलण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. आज सर्व क्षेत्रात घुसखोरी झालेली आहे. त्यांना मराठी आली पाहिजे असा आग्रह राज्य सरकारने सुरुवातीपासून का धरला नाही ? आज राज्यात जे विरोधक आहेत ते गेले अनेक दशके राज्यकर्ते होते. त्यांनी मराठीसाठी आजतागायत काय भरीव कामगिरी केली आहे ? उलट त्यांनी ज्या ज्या ठिकाणी मराठी वगळली तिथे त्यांनी मराठीचा हिरीरीने पुरस्कार करायला हवा होता. पण तसे झाले नाही. बॉम्बेचे मुंबई न होता अधिक काळ ते बंबईच राहिले ते कशामुळे ? आज मराठी माणूस आपल्या भाषेशी इमान राखून आहे. तथापि तो हिंदी वा अन्य भाषेचा तिरस्कार करत नाही. हिंदी मराठी जनांची संवाद भाषा नाही, पण हिंदी ही मराठी जनांची आवडती श्रवण आणि आकलन भाषा आहे. याला सर्वस्वी कारणीभूत हिंदी चित्रपटसृष्टी आणि हिंदी गीतांची विविधभारती / आकाशवाणी आहे. पूर्वापार महाराष्ट्रात येऊन मराठीची आवश्यकता परप्रांतीयाला भासत नसेल तर ते सर्वांचे अपयश आहे.

भाषेपोटी हिंसा, दुभंग नको

मराठी बोलणार नाही, मराठीची गरज नाही असे काही लोक म्हणत आहे. त्यांना चोप दिला जात आहे. कायदा हातात घेणे समर्थनीय नाही. भाषा ही जोडणारी असते तोडणारी नसते. मराठीचा आग्रह हा असंतोष आणि दुभंग यात बदलणार नाही हे पाहायला हवे. एकाएकी मराठीचा आग्रह हा बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीचा राजकीय विषयपटल ठरवण्याचा भाग आहे. पण त्यासाठी मराठी माणसाला प्यादे बनवणे चुकीचेच आहे. मराठी माणूस आणि मराठी भाषेबद्दल प्रेम आहे याचा अर्थ हिंदीशी वैर आहे असा नव्हे. आज मराठी माणूसही हिंदी वा इंग्रजी मिश्रित मराठी बोलतो. आज एकीचे बळ आजमावणारी भाऊबंदकी स्वतः हिंदी आणि इंग्रजीत अखंड आणि आकंठ बुडालेली आहे. आज जे इतरांचे शिक्षण इंग्रजीत झाल्याचे दाखले देतात तिथेच त्यांचा मराठी आग्रहाचा मुद्दा आधारहीन होतो. आज माध्यमे ज्या प्रकारे या विषयाची मांडणी करत आहे ती आगीत तेल ओतणारी आहे. समाजाला गृहीत धरून ज्यांनी भावनेचे, भाषेचे, धर्माचे राजकारण केले ते आज मराठीचा मतलबी आपलेपणा दाखवत आहेत. हे जनतेला समजत आहे. जनता मराठी मानते. हिंदी जाणते. पण तिला दुराग्रह नकोय. हिंसा, जाळपोळ नकोय. स्वार्थी राजकारण नकोय. भारतीयत्वात फुट नकोय. जे राजकीय पक्ष अमराठी गोरगरीब लोकांवर मराठीची सक्ती करत आहेत ते मुस्लीमांना मराठीचा आग्रह करण्याचे धाडस का करत नाहीत ? मराठीचा प्रचार आणि प्रसार सुलभतेने करण्यात खरे कौशल्य पणाला लागणार आहे. तो मार्गे कोणी कधी पत्करला नाही आणि पत्करणारही नाही. कारण त्यातून मतांचा पाऊस पडत नाही. सत्तेपासून दूर झालेले पक्ष अवकाश शोधताना कासावीस आणि मतसंग्रह यासाठी अगतिक झालेत. त्यासाठी मराठी भाषेच्या प्राधान्याचा मुद्दा पेटवून ते रुदाली करताहेत. पण हा प्रयास व्यर्थ आहे. मराठी माणूस समजदार आहे. तो दुराग्रह आणि व्देषापासून दूर राहणारा आहे. तो तसा आहे म्हणून महाराष्ट्राने भारताला सहर्ष सामावून घेतले आहे.  
 
राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड,मध्य प्रदेश या टापूत हिंदी हीच मातृभाषा आहे. हिंदी पट्टयात तिसरी भाषा म्हणून इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हिंदी अर्थात मावशीच्या या बहुस्थानाकडे दुर्लक्ष करणे आत्मवंचना ठरेल. देशाची एकता, अखंडताही भाषेमुळे  मजबूत झाली पाहिजे. भाषाकलह यापुढे कायदा, सुव्यवस्था याचे पालन झाले पाहिजे. रोजीरोटी कमावणे आणि भाषा स्वातंत्र्य घटनेने दिले आहे. राजकीय स्वार्थ आणि मतपेटी यासाठी माय आणि मावशी यात भांडण लावून दुसर्‍या अर्थाने फूट पाडण्याचा, भांडण पेटवण्याचा डाव महाराष्ट्रात कोण खेळत आहे ?  
 

Related Articles