व्हॉट्सऍप कट्टा   

अवंतीनगरीचे राजे बाहुबली यांना राजज्योतिष्याची गरज होती. मंत्रिपरिषदेसमोर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. राजज्योतिषाबाबत घोषणा केली जावी आणि पात्र व्यक्तीला पारखून नियुक्त केले जावे अशी सर्व मंत्रिगणांनी सहमतीने ठरवले.
 
या पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखती द्याव्यात अशी दवंडी दुसर्‍या दिवशी पिटवण्यात आली. सर्व उमेदवार ठरलेल्या वेळी दरबारात उपस्थित झाले. राजाने स्वत:च मुलाखती घेण्यास सुरुवात केली. अनेक ज्योतिष्यांनी आपल्या ज्ञानाचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली; परंतु राजाचे समाधान झाले नाही.
अखेरीस तीन ज्योतिषी उरले; त्यांतील पहिल्या ज्योतिष्याला राजाने विचारले, की तुम्ही भविष्य कसे सांगता ? ज्योतिषी म्हणाला, नक्षत्र पाहून. राजाने दुसर्‍याला हाच प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला, हस्तरेषा पाहून भविष्य सांगतो. तर तिसरा ज्योतिषी उत्तरला फासे टाकून खात्रीलायक भविष्य वर्तवितो; परंतु राजाला कुणाचीच उत्तरे आवडली नाहीत.
 
अचानक राजाला तेव्हा आपल्या राज्यातील निर्धन ज्योतिषी विष्णुशर्माची आठवण झाली. विष्णुशर्माला तात्काळ बोलावण्यात आले. राजाने विष्णुशर्माला विचारले, तुम्ही ज्योतिषी असूनसुद्धा या मुलाखतीसाठी का आला नाहीत? तुम्हाला राजज्योतिषी होणे आवडत नाही काय?
 
विष्णुशर्माने सांगितले- महाराज, मी घरी बसून माझ्या स्वत:च्या पत्रिकेचा अभ्यास केला व माझ्या अभ्यासानुसार या पदावर मीच नियुक्त होणार आहे. तुम्ही मला निमंत्रण पाठवून बोलावून घ्याल, हे मला माझ्या अभ्यासातून आधीच कळाले होते. त्यामुळे मी या पदासाठी मुलाखत देण्यास आलो नाही. 
राजाला विष्णुशर्माची अभ्यासू वृत्ती व त्याचा आत्मविश्वास या दोन्हीचा अभिमान वाटून त्याने विष्णुशर्माला राजज्योतिषी म्हणून नियुक्त केले.
तात्पर्य : ज्यांचा स्वत:वर व स्वत:च्या अभ्यासावर प्रचंड विश्वास असतो तो कधीच हार जात नाहीत व त्यांच्याकडे संधी आपोआप चालून येते.
----
चांगले आचरण
 
दोन तरुण साधू उंच डोंगरावर असणार्‍या आपल्या मठाकडे निघाले होते. रस्त्यामध्ये एक ओढा होता. त्या ओढ्याच्या काठी एक तरुण युवती बसलेली होती. त्या तरुणीलाही तो ओढा पार करून गावात जायचे होते. पण ओढ्याला असणार्‍या पाण्यामुळे ती तो ओढा पार करू शकत नव्हती. तरुणीला तर ओढा पार करून पलीकडे जाणे गरजेचे होते. दोन साधूंपैकी एका साधूने हे पाहिले व त्याने त्या तरुणीला विश्वासपूर्वक दोन गोष्टी सांगितल्या व त्या तरुणीला आपल्या खांद्यावर बसवले आणि त्या तिघांनी मिळून तो ओढा पार केला. तरुणीने तो ओढा पार होताच साधूचे आभार मानले व ती आपल्या गावात निघून गेली. दोन्ही साधू आपल्या आश्रमाकडे निघाले. ज्या साधूने तरुणीला खांद्यावर घेतले होते त्याच्याशी दुसरा साधू बराच वेळ काहीच बोलला नाही.
 
त्या साधूने दुसर्‍या साधूच्या मनातील चलबिचल ओळखली व तो त्याला म्हणाला, मित्रा! बराच वेळ मी पाहतो आहे पण तुला काही तरी खुपते आहे. तेव्हा विना संकोच तू मनातील गोष्ट मला सांग. तो दुसरा साधू म्हणाला, हे मित्रा, आपल्या संप्रदायामध्ये स्त्रीस्पर्श सुद्धा वर्ज्य आहे. तरी तू त्या स्त्रीला खांद्यावर बसवून ओढा पार केलास हे काही मला आवडले नाही. त्यावर तो मदत करणारा साधू म्हणाला, मित्रा, ती स्त्री जेव्हा माझ्या खांद्यावरून उतरली तेव्हाच मी तिला सोडले, मात्र तू अजूनही तिला मनात बाळगून आहेस. मी तिला मदत करण्याच्या दृष्टीने स्पर्श केला पण तू अजूनही मनातून तिला वारंवार स्पर्श करत आहेस. संन्यास याचा अर्थ कुणाचीही सेवा न करता अलिप्त राहणे असा न होता मनातील वासना आणि विकारांवर ताबा मिळवणे असा होतो.
 
तात्पर्य : माणसाच्या मनातून चांगले आचरण असल्यास बाहेरील आचरण हे चांगलेच होते. मनात पाप ठेवून चांगले बनत नाही.
---
दुसर्‍यांना योग्य धडा शिकवण्यासाठी आणि त्यांना प्रेरित करण्यासाठी आपल्याला स्वत:मध्ये चांगले बदल घडवणे आवश्यक आहे. आपल्यातील गुण, विचार आणि वर्तन हेच इतरांना शिकवण्याचा आधार असतो. जर आपण आपले वर्तन, दृष्टिकोन आणि कृत्यांमध्ये सकारात्मक बदल घडवले, तरच इतर लोक आपल्याला आदर्श मानतील आणि आपल्याकडून शिकण्याची प्रेरणा घेतील. आपल्याला लोकांनी निंदा केली नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी आपण स्वत:च्या जीवनात शिस्त, इमानदारी, आणि समर्पण ठेवले पाहिजे. दुसर्‍यांना शिकवण्याची क्षमता आपल्या कृत्यांतूनच दिसते. जेव्हा आपण योग्य मार्गावर चालतो, तेव्हा लोक आपल्या कामाचे आदर्श घेऊन आपल्याकडून शिकतात, आणि त्या वेळी आपल्यावर बोटे दाखवली जाण्याचा प्रश्नच येत नाही.
---
गण्या : तू कुठला आहेस?
मन्या : माझं लग्न झालं, आता मी कुठलाच राहिलो नाही!

Related Articles