ससूनचे कामकाज ऑनलाइन   

रुग्णांची माहिती एक क्लिकवर

पुणे : ससून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णांची नोंदणी आता ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. परिणामी केस पेपर काढण्यासाठीचा कालावधीत कमी झाला आहे. तसेच रुग्णांच्या नोंदी आणि माहितीचे संकलन करणे सोपे झाले आहे. या प्रणालीमुळे डॉक्टरांना एका क्लिकवर रुग्णांची माहिती मिळणे शक्य झाले आहे.
 
ससून सर्वोपचार रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची नोंदणी कर्मचारी लिखित पद्धतीने करीत होते. गेल्या महिन्यापासून रुग्णांची ऑनलाइनद्वारे नोंदणी करण्यात येत आहे. राष्ट्रीय सूचना केंद्राने विकसित केलेल्या नेक्स्ट जनरेशन ई-हॉस्पिटल प्रणालीचा यासाठी वापर केला जात आहे. रुग्णालयात ऑनलाइन नोंदणीसाठी एकूण २० संगणक आणि २० कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील १८ संगणक बाह्यरुग्ण विभागात आणि मानसोपचार व अस्थिव्यंगोपचार विभागात प्रत्येकी एक संगणक बसविण्यात आला आहे. या संगणकांवर ससूनमधील कर्मचार्‍यांकडून रुग्णालयात दररोज येणार्‍या सुमारे १ हजार ७०० रुग्णांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे.
 
ससूनमध्ये ओपीडीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे काही वेळा केस पेपर काढण्यासाठी रुग्णांना वेळ लागतो. मात्र, आता ऑनलाइन नोंदणीमुळे कमी वेळेत सर्व प्रक्रिया करता येणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमध्ये पूर्वी ‘हेल्थकेअर मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीमद्वारे’(एचएमआयएस) रुग्णांची नोंदणी करण्यात येत होती. मात्र, जुलै २०२२ रोजी अचानक ही प्रणाली बंद करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला होता. तेव्हापासून सर्व रुग्णालयांमधील ‘एचएमआयएस’ प्रणाली बंद होती. आता राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन नोंदणी सुरू करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे.
 
सध्या ऑनलाइनची सुविधा केवळ बाह्यरुग्ण विभागात सुरू झाली होती. आगामी तीन महिन्यात आंतररुग्ण विभागातही ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. आंतररुग्ण विभागात ही सुविधा सुरू झाल्यावर डॉक्टरांना एका क्लिकवर रुग्णांची सर्व माहिती मिळणे शक्य होणार आहे. राज्यातील कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतले असले तरी त्यांची माहिती डॉक्टरांना सहज मिळणे शक्य होणार आहे. रुग्णांचा आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, किती वेळा उपचार घेतले, या प्रकारची माहिती ऑनलाइनद्वारे नोंदविण्यात येत आहे.
 
ससून रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची नोंदणी ऑनलाइन सुरू झाली आहे. येत्या तीन महिन्यांत आंतररुग्ण विभागातील रुग्णांची नोंदणीही ऑनलाइन करण्यात येईल. त्यातून रुग्णाची माहिती, वैद्यकीय तपासणी अहवाल, उपचार आणि शस्त्रक्रिया आदी तपशील एका क्लिकवर उपलब्ध होतील. 
 
- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, बीजे वैद्यकीय महाविद्यालय
 
ऑनलाइन नोंदणीचे फायदे
 
कमी वेळेत रुग्णांची नोंदणी होते.
एका क्लिकवर डॉक्टरांना रुग्णाची माहिती कळते.
रुग्णांची माहिती संकलित ठेवता येते.
रुग्णांना नोंदणी क्रमांक मिळतो.
डॉक्टरांना कागदावर लिहिण्याची गरज पडत नाही.

Related Articles