खिडकीच्या गजाला लटकलेल्या लहान मुलीचे प्राण वाचवले   

अग्निशमन जवानाची सतर्कता

पुणे :सोसायटीच्या तिसर्‍या मजल्यावर असलेल्या सदनिकेच्या खिडकीतील पोकळीतून बाहेर जाऊन लटकलेल्या चार वर्षांच्या मुलीचे प्राण अग्निशमन दलाच्या जवानाने सतर्कता दाखवून वाचवले. जवान योगेश अर्जुन चव्हाण हे वेळीच घटनास्थळी पोहोचल्यामुळे थोडक्यात या मुलीचा जीव वाचला आणि कुटुंबाचा जीव भांड्यात पडला. हा सर्व प्रकार कोणीतरी मोबाईलमध्ये कैद केला असून, समाजमाध्यमावर त्याची चित्रफित व्हायरल झाली आहे.यासाठी अग्निशमन दलाच्या जवानाचे आभार मानले जात आहेत.
 
कात्रज येथील गुजर निंबाळकरवाडीमध्ये असलेल्या खोपडेनगरमध्ये सोनवणे बिल्डिंगमध्ये मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. सोसायटीच्या तिसर्‍या मजल्यावर एक चार वर्षांची मुलगी खिडकीच्या बाहेरच्या बाजूला लटकल्याचे उमेश सुतार नावाने पाहिले. त्यांनी याबाबत आरडाओरडा करण्यास सुरूवात केल्यानंतर तेथेच राहणारे अग्निशमन दलातील तांडेल योगेश चव्हाण धावत बाहेर आले. त्यांनी गॅलरीत येऊन पाहिले असता, भाविका चांदणे नावाची चार वर्षांची मुलगी खिडकीत अडकली होती. घरात कोणीच नव्हते. तिची आई दुसर्‍या मुलीला शाळेत सोडायला गेली होती. योगेश चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न करता तिच्या घराकडे धाव घेतली. ते तात्काळ तिसर्‍या मजल्यावर पोहोचले. मात्र घराला कुलूप होते. आई येईपर्यंत त्यांनी वाट पाहिली. आईने दरवाजा उघडताच योगेश यांनी मुलीला खिडकीतून आत ओढले आणि तिचा जीव वाचवला.

Related Articles