पुतळ्याची विटंबना करणारा वेडसर नाही   

पोलिसांची न्यायालयात माहिती 

पुणे : महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा सूरज आनंद शुक्ला (वय ३५, विश्रांतवाडी) हा वेडसर असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी न्यायालयात केला. मात्र, शुक्ला याला पहाटे चारच्या सुमारास अटक केल्यापासून ते न्यायालयात हजर करेपर्यंत तो वेडसर असल्याचे दिसून आले नसल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. दरम्यान, न्यायालयाने काही बांगड्या घातल्या आहेत का? आम्ही घातल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून शुक्ला याने न्यायालयाचा अवमान केला. याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी.आर. डोरणपल्ले यांच्या न्यायालयाने शुक्ला याला एक हजार रूपये दंड आणि सात दिवसांची कारावासाची शिक्षा सुनावली.
 
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणात बंडगार्डन पोलिसांकडून शुक्ला यास अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का? अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपीने हे विधान करत न्यायालयाचा अवमान केला. यावेळी, सर्व साक्षीदारांचे जबाब तत्काळ नोंदविले. तसेच, आरोपीने गुन्ह्याचीदेखील कबुली दिली.
 
आरोपीचे वकील पी. एम. मिश्रा यांनी गुन्ह्याची कबुली दिली व चूक झाली माफी करावी. आरोपीला कमीत कमी शिक्षा व दंड ठोठावण्यात यावा, अशी विनंती केली, तसेच आरोपी वेडसर असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, तो वेडसर असल्याचे कोणतेही कागदपत्रे न्यायालयात सादर केली नाहीत. 

Related Articles