बासमतीची निर्यात घटली   

स्थानिक बाजारात मागणी कमी 

पुणे : दरवर्षी देशातला सुमारे २५ टक्के तांदूळ इराणला पाठविला जातो. मात्र मागील महिन्यात इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष सुरू झाला होता. त्यामुळे बासमतीच्या निर्यातीला मोठा फटका बसला आहे. स्थानिक बाजारात ग्राहकांकडून मागणीच कमी आहे. इराणमधील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे निर्यात वाढण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. 
 
इराण हा भारतीय तांदळाचा सर्वांत मोठा आयातदार आहे. मध्यंतरीच्या संघर्षामुळे तांदळाची निर्यात घटली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात मागणी कमी असल्याने साठा अधिक झाला आहे. किरकोळ बाजारातील दर स्थिर आहेत. भारतातून दर वर्षी निर्यात होणार्‍या एकूण बासमती तांदळापैकी २५ टक्के तांदूळ इराणला पाठवला जातो. इराणमध्ये पुरवठा कमी झाल्याने बासमती तांदळाच्या साठ्यात वाढ झाली आहे. भारतीय बाजारांत मागणी कमी आणि साठा जास्त अशी स्थिती असल्याने दर कमी होण्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे. किरकोळ बाजारांत बासमती तुकडा, मोगरा प्रत्येकी साठ रुपये प्रतिकिलो, कणी चाळीस रुपये प्रतिकिलो आणि अख्खा बासमती शंभर ते १२० रुपये प्रतिकिलो या दराने विकला जात आहे.
 
पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यात बासमती तांदळाची लागवड होते. निर्यात कमी झाल्याचा फटका येथील व्यवसायाला बसला आहे. मध्यंतरी विमा कंपन्यांनी इराणला तांदूळ निर्यातीसाठी विमा देणे बंद केले होते. लाल समुद्राचा व्यापारी मार्ग हा भूमध्य समुद्राला हिंदी महासागराशी जोडणारा एक महत्त्वाचा जलमार्ग आहे. हा मार्ग युरोप आणि आशिया दरम्यानच्या व्यापारासाठी खुष्कीचा मानला जातो. दोन देशांतील संघर्षामुळे या मार्गालाही धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ‘केप ऑफ गुड होप’ हा सुरक्षित मात्र, लांब आणि खर्चीक मार्ग वापरला जात आहे. परिणामी, वाहतूक खर्चात वाढ झाली आहे.
 
३० टक्क्यांनी निर्यात घटली 
 
इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे बासमती तांदळाची निर्यात घटली आहे. मागील तीन महिन्यांचा विचार करता बासमती निर्यातीत ३० टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 
 
- राजेंद्र बाठिया, व्यापारी व निर्यातदार.
 
परिस्थितीनुसार निर्यात वाढेल 
 
भारत दरवर्षी बासमतीची तिसर्‍या क्रमाकांची निर्यात इराणला करतो. मात्र इराणमध्ये युद्धस्थिती असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून निर्यात थांबली आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष निवळत आहे. त्यामुळे येत्या काळात परिस्थितीत जशी सुधारणा होईल, तशी निर्यात वाढेल. 
 
- राजेश शहा, व्यापारी व निर्यातदार 

Related Articles