दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात सरकारी यंत्रणांची टोलवाटोलवी   

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या दिव्यांग ठरणार्‍या शिक्षकांची वैद्यकीय तपासणीस ससून रुग्णालयाने नकार दिल्याने जिल्हा परिषदेची मोठी पंचायत झाली आहे. मात्र, दिव्यांगाच्या नावाखाली बोगस प्रमाणपत्र मिळवूून बदल्यांमध्ये सवलत घेणार्‍या शिक्षकांची तपासणी करण्याचा तसेच फसवणूक करणार्‍या शिक्षकांवर कारवाईची मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेने केली आहे. त्यामुळे दिव्यांग आयुक्तालयाने अशा शिक्षकांवर कारवाईची जिल्हा परिषदेला सूचना केली आहे. मात्र, दिव्यांग म्हणावणार्‍या शिक्षकांच्या कारवाईवरून सरकारी यंत्रणांची एकमेकांवर टोलवाटोलवी सुरू आहे. 
 
जिल्हा परिषदेच्या संवर्ग एक आणि दोन मधील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. योग्य ठिकाणी बदली होण्यासाठी शिक्षकांनी चक्क, बहिरे, आंधळे, लुळे असल्याची बोगस प्रमाणपत्रे दिल्याचे समोर आले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने बी जे मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडे शिक्षकांची यादी पाठवून शिक्षकांच्या दिव्यांगाची फेरतपासणी करण्याची विनंती केली होती. मात्र, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव यांनी जिल्हा परिेदेला उलट पत्र पाठवून ही तपासणी करण्यास आम्ही असमर्थ असल्याचे कळविले. दिव्यांग शिक्षकांच्या फेर तपासणीसाठी मुंबईतील जे जे रुग्णालय तसेच उपसंचालक आरोग्य सेवा यांच्या अखत्यारीतील रुग्णालयात शिक्षकांना पाठविण्यात यावे असे ससून रुग्णालयाने सूचवले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या दिव्यांगाची तपासणी करायची काय असा प्रश्न जिल्हा परिषदेला सतावत आहे.
 
यासंदर्भात प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेने दिव्यांग आयुक्तालयाचे लक्ष वेधून त्यांच्याकडे कारवाईची मागणी केली. त्यावर दिव्यांग आयुक्त प्रवीण पुरी यांनी पत्र पाठवून अशा शिक्षकांवर कारवाई करण्याची सूचना जिल्हा परिषदेला केली आहे. त्यामुळे बोगस प्रमाणपत्राच्या कारवाईवरून जिल्हा परिषद, ससून रुग्णालय आणि दिव्यांग कल्याण आयुक्तालयाची एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरू आहे.
 
सरकारची फसवणूक केली
 
बदल्यातून सूट घेतलेल्या शिक्षकांनी अपंगत्वाची खोटी व चुकीची प्रमाणपत्रे सादर करून सरकारची दिशाभूल केली आहे. दिव्यांग शिक्षक चारचाकी वाहन चालवित आहेत. ते दिव्यांग असताना वाहन परवाना मिळविताना त्यांनी सरकारची फसवणूक केली आहे.

Related Articles