बडोद्यात पूल कोसळूनदहा जणांचा मृत्यू   

पाच वाहने नदीत

बडोदा : गुजरातमधील बडोदा जिल्ह्यात बुधवारी सकाळी जुन्या पुलाचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून नऊ जणांना वाचवण्यात आले आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले. हा पूल चार दशके जुना होता. या पुलाची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
बडोदा आणि आणंदला जोडणारा हा पूल महिसागर नदीवर बांधण्यात आला आहे. पुलावरून वाहनांची ये-जा सुरू असताना काही भाग कोसळला, अशी माहिती पोलिस अधीक्षक (बडोदा ग्रामीण) रोहन आनंद यांनी दिली.या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला. तर, १० जणांना वाचवण्यात आले असून, पाच जणांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यापैकी, कोणीही गंभीर नाही. बचाव कार्य अजूनही सुरू आहे, असे आनंद यांनी सांगितले.
 
काल सकाळी साडेसात वाजता पुलाचा १० ते १५ मीटर लांबीचा भाग कोसळला. त्यामुळे पाच वाहने नदीत कोसळली. यामध्ये दोन मालमोटारी, दोन मोटारी आणि एक ऑटोरिक्षा यांचा समावेश आहे, असे बडोद्याचे जिल्हाधिकारी अनिल धामेलिया यांनी सांगितले.एक मालमोटार अर्धवट पुलावर लोंबकळत आहे. मालमोटारीला हटविण्याचे काम सुरू आहे. मात्र, पुलाची उंची, अवस्था, नदीतील पाणी आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे अडथळा येत आहे, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.
 
या दुर्घटनेत दुचाकीवरून नदीत पडलेले तीन जण पोहून बाहेर आले, असेही ते म्हणाले.या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १० जणांमध्ये एका मुलाचा समावेश आहे, असे पोलिस निरीक्षक विजय चरण यांनी सांगितले.या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच, दुर्घटनेच्या चौकशीचे आणि अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच, मृतांच्या वारसांना दोन लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
 
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरपालिका आणि बडोदा महानगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच, स्थानिकांसह बचाव आणि मदत कार्यास सुरुवात केली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे पथकदेखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

Related Articles