मोटार पेटल्याने चौघांचा होरपळून मृत्यू   

डलास : अमेरिकेत भीषण अपघाताची घटना मंगळवारी घडली असून यात हैदराबादच्या एकाच कुटुंबातील चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. चुकीच्या दिशेने आलेल्या मालमोटारीने मोटारीला धडक दिली. अपघातानंतर मोटारीला आग लागली आणि त्यातच होरपळून या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला.मृतांमध्ये व्यंकट बेजुगम, पत्नी तेजस्विनी चोलेटी आणि दोन मुले सिद्धार्थ आणि मृदा बेजुगम यांचा समावेश आहे. हे कुटुंब सुट्ट्यांमध्ये अमेरिकेला गेले होते.
 
व्यंकट बेजुगम यांचे कुटुंब मूळचे सिकंदराबादमधील सुचित्रा भागातील होते. सध्या ते डलासजवळ ऑब्रे येथील सटन फील्ड्समध्ये राहात होते. चौघांचे पार्थिव भारतात आणले जाणार आहे. येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. हे कुटुंब अटलांटा येथे नातेवाईकांना भेटायला गेले होते. तेथून डलासला परत जात असताना हा अपघात झाला. एका मालमोटारीने त्यांच्या मोटारीला समोरून जोरदार धडक दिली. त्यामुळे मोटारीला आग लागली. आगीत होरपळून या चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
 
आग खूप मोठी असल्यामुळे अमेरिकन अधिकारी फॉरेन्सिक तपासणी करत आहेत. यामध्ये दंत नोंदी आणि डीएनए चाचणी यांचा समावेश आहे. मृतांची ओळख पटवण्यासाठी हे आवश्यक आहे. ओळख पटल्यानंतरच त्यांचे मृतदेह कुटुंबीयांना सोपवले जातील. 
 

Related Articles