मुसळधार पावसामुळे उत्तरकाशीतील पूल वाहून गेला   

डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्रीकडे जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील ओजरी येथील पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याची घटना घडली आहे, यामुळे यमुनोत्रीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे, अशी माहिती येथील अधिकार्‍यांनी सोमवारी दिली. 
 
रुद्रप्रयाग जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. उत्तरकाशीबरोबरच टेहरी, बागेश्वर, डेहराडून आणि रुद्रप्रयाग या जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रुद्रप्रयाग आणि आसपासच्या जिल्ह्यांत पाऊस पडल्याने अलकनंदा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तथापि, मुसळधार पाऊस होऊन पाणीपातळीत वाढ झाली असली, तरी नदीने अजूनही धोक्याची पातळी गाठलेली नाही. 
 
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी रविवारी यमुनोत्रीला जाणार्‍या रस्त्यावरील सिलाई बंद आणि ओजरी बंद या परिसराची हवाई पाहणी केली. देशातील १९ ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, आसाममधील तीन ठिकाणी गंभीर पूरस्थिती असल्याची माहिती केंद्रीय जल आयोगाने सोमवारी दिली आहे. आसाममधील धुबरी (दक्षिण) नदीवर गोलाघाट आणि नुमालीगड या ठिकाणी, तर दिक्शॉ नदीवर शिवसागर येथे गंभीर पूरस्थिती असल्याचे सांगण्यात आले. आसाममध्ये एकूण सात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील चार, बिहार आणि ओडिशातील दोन आणि मध्य प्रदेशातील एका ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
 

Related Articles